विशेष प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : मी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक नियोजित केली होती. मात्र त्यामध्ये आदित्य ठाकरे यांनी अडथळा आणला असा गौप्यस्फोट करत आदित्य ठाकरे यांचे जेवढे वय आहे तेवढी ही त्यांना अक्कल नाही, अशी बोचरी टीका माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना केसरकर म्हणाले, आदित्य ठाकरे यांच्यामुळेच शिवसेनेचे तुकडे झाले. त्यांच्यामुळेच शिवसेनेचे नुकसान झाले आहे
रामटेक बंगला अपशकुनी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर बोलताना केसरकर म्हणाले
या बंगल्यामध्ये स्वर्गीय विलास देशमुख, शरद पवार, शिवाजीराव पाटील निलंगेकर राहिले. हे सर्व मुख्यमंत्री झाले. त्यामुळे मी सुधा मंत्रिपदापेक्षा मोठ्या पदावर मी जाईल. कोणतीही वास्तू वाईट नसते ती नेहमी आशीर्वाद देत असते.
मंत्रिपद मिळाले नसल्याच्या प्रश्नावर केसरकर म्हणाले, अनेक लोकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केले. त्यांची मला कीव वाटते. माझं मंत्रिपद देव ठरवत असतो मी कदाचित मंत्र्यांपेक्षा वरच्या पदावर जाईन. मी साईबाबांचा भक्त आहे. मला पद द्यायला साईबाबा समर्थ आहेत. मला मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली त्यामुळे मी आनंदात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात दीपक केसरकर यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्री पदाचा कार्यभार होता. शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणूनही ते जोरदार बाजू मांडत होते. मात्र राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात केसरकर यांचा समावेश झाला नाही. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे.




















