हरियाणा निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी ‘सपा’ने जाहीर केले होते उमेदवार Samajwadi Party
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यातील संबंधात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीमुळे संबंधात दुरावा आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सपा काँग्रेसला नऊ पैकी फक्त दोन जागा देत होती. काँग्रेसला पाच जागा हव्या होत्या. या कारणामुळे काँग्रेस संतप्त झाली असून पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेऊ शकते.
हरियाणा निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी सपाने सहा जागांसाठी उमेदवार जाहीर केले होते. या घोषणेबाबत काँग्रेसचे यूपी प्रभारी अविनाश पांडे म्हणाले की, ही एकतर्फी घोषणा आहे. यावर आपण चर्चा करू शकत नाही.
उत्तर प्रदेशातील काही वरिष्ठ काँग्रेस नेत्यांवर विश्वास ठेवला तर ते सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याच्या बाजूने आहेत. मात्र, पोटनिवडणुकीत काँग्रेस एकही उमेदवार उभा करणार नाही, अशी दाट शक्यता आहे. सोमवारी अधिकृत घोषणा होऊ शकते. या सर्व प्रकारानंतर उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी पोटनिवडणुकीत आपले उमेदवार उभे करणार असल्याचे म्हटले परंतु याचबरोबर पाच जागांसाठी सपाशी बोलणी सुरू आहेत आणि अंतिम निर्णय राष्ट्रीय नेतृत्व घेईल असंही ते म्हणाले.
उत्तर प्रदेशात 10 जागांवर पोटनिवडणूक होत आहे. मिल्कीपूरशिवाय, सिसामऊ, गाझियाबाद, कुंडरकी, कटहारी, फुलपूर, खैर, माझवान आणि मीरापूर या उर्वरित नऊ जागांवर निवडणूक होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीसाठी १३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. सपाने अलीगढच्या खैर आणि गाझियाबाद सदर जागा काँग्रेसला देऊ केल्या होत्या. या पोटनिवडणुकीला 2027 ची लिटमस टेस्ट असेही म्हटले जात आहे.
अखिलेश यादव यांना हरियाणातील काही जागांवर निवडणूक लढवायची होती पण काँग्रेसने एकही जागा दिली नाही. याशिवाय सपा महाराष्ट्रात 12 जागांची मागणी करत आहे. पक्षानेही पाच जागांवर उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसने महाराष्ट्रात सपाला महत्त्व न दिल्यास त्याचा परिणाम उत्तर प्रदेश विधानसभेत दिसून येईल, असे संकेत सपाचे आमदार रविदास मेहरोत्रा यांनी दिले.