पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणि पर्यायानं भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना झाली. पण मोंदींचा पराभव दूरच, एकमेकांचा पराभव करण्याचा तर प्रयत्न नाही ना, अशी शंका आता निर्माण व्हायला लागलीय. एकीकडे नितीश कुमार नेता व्हावे, म्हणून जेडीयू पोस्टरबाजी करतंय, तर ममता असो केजरीवाल असो की इतर घटक पक्षातले नेते. पंतप्रधान पदाचा उमेदवार हा विषय राहिला बाजूला, जागा वाटपावरून ओढाताण सुरू झालीय. पाचपैकी तीन राज्य काँग्रेसला गमवावी लागली. त्यामुळे घटकपक्ष आता काँग्रेसला जागा वाढवून देणार नाहीत. हेच कारण वादाचं ठरणारेय. पंजाबमधल्या लोकसभेच्या ११ जागांपैकी एकही जागा आपला देण्याची काँग्रेसची तयारी नाहीय. दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये एकूण ४२ जागा आहेत. त्यात काँग्रेसला फक्त २ जागा सोडण्याची तृणमूलनं तयारी दाखवलीय. ही दोन्ही राज्ये काँग्रेससाठीही महत्त्वाची आहेत. त्यामुळे जागा वाटपावरची ही धुसफूस समोर आली.