विशेष प्रतिनिधी
पुणे: शहरातील नवले ब्रीज येथे गुरुवारी (दि. १३) साडे पाच वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. सातारा रोडवरून पुण्याच्या दिशेने येणार्या कंटेनर, ट्रक आणि चार चाकी वाहन एकमेकांवर आदळल्याची घटना घडली. या घटनेमध्ये ट्रक आणि कंटेनरला आग लागली. या अपघातामध्ये सहा ते सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २० ते २५ जण जखमी झाले आहेत.
यातील जखमी नागरिकांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अग्निशामक विभागाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. अपघाताच्या घटनेमुळे पुणे बंगळूरू हायवेवर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. Crash Near Navale Bridge
साताराहून मुंबईच्या दिशेने कंटेनर जात होता. नवले पुलाजवळील सेल्फी पॉइंटजवळ कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे पुढील १५ ते २० वाहनांना कंटेनर चालकाने उडवल्याने तसेच ट्रक आणि कंटेनरच्यामध्ये एक चार चाकीचा चक्काचूर झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आग लागली. या आगीत सहा ते सात जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तर २० ते २५ जण जखमी झाली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.
या अपघातानंतर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पोलीस, अग्निशमन विभागाकडून मदतकार्य सुरू होते.
दोन कंटेनरमध्ये अडकून कारचा चक्काचूर
अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी ५.४० वाजता नवले पुलावर अपघात होऊन वाहनांनी पेट घेतल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाची आठ वाहने घटनास्थळी पोहोचली. दोन कंटेनर व त्यामध्ये चारचाकी वाहन अडकून त्याने ही मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याचे जवानांच्या लक्षात आले. पाण्याचा मारा करून आग विझवण्यात आली. त्यानंतर या ठिकाणाहून मृतदेह बाहेर काढण्यात आले. या कंटेनरने आग लागण्याच्या आधी बऱ्याच वाहनांना धडक दिली. त्यातही अनेक जण जखमी झाल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. या ठिकाणी अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासह चार अधिकारी व जवळपास चाळीस जवान कार्यरत होते.
महापालिकेकडून युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य
या भीषण अपघातानंतर पुणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने बचाव आणि मदतकार्य सुरू केले आहे. पालिकेच्या अग्निशमन दलासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी युद्धपातळीवर मदतकार्य करत आहेत. अपघाताची माहिती मिळताच, पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून तीन फायर इंजिन, एक ब्राउझर आणि दोन रेस्क्यू व्हॅन, तसेच पीएमआरडीए च्या तीन फायर गाड्या व दोन रेस्क्यू व्हॅन तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. जवानांनी तातडीने ‘सर्च अँड रेस्क्यू’ मोहीम सुरू केली. बचावकार्यासाठी आवश्यक असलेले क्रेन, जेसीबी आणि रुग्णवाहिका (ॲम्बुलन्स) यांची तात्काळ व्यवस्था करण्यात आली. घटनास्थळी लायगुडे दवाखाना आणि कमला नेहरू रुग्णालयातील डॉक्टरांची पथके कार्यरत आहेत. तसेच, ‘१०८’ क्रमांकाच्या तीन रुग्णवाहिका आणि पुणे मनपाच्या पाच रुग्णवाहिका जखमींना सेवा देत आहेत. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींवर प्लस हॉस्पिटल, सिल्व्हर ब्रीच हॉस्पिटल आणि नवले हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात अपघातग्रस्त वाहने असून, ती क्रेनच्या साहाय्याने हटवण्यात आली. अपघातामुळे रस्त्यावर ऑईल सांडल्याने रस्ता निसरडा झाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांकडून रस्ता स्वच्छ करण्यात आला. मात्र, रस्त्यावरील वाहतूक सुरू असल्याने मदतकार्यात काही प्रमाणात अडथळे येत होते.
अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे
स्वाती संतोष नवलकर (वय ३७, रा. विश्वास पॅलेस, धायरी फाटा), शांता दत्तात्रय दाभाडे (वय ५४), दत्तात्रय चंद्रकांत दाभाडे वय ५८, रा. धायरी फाटा), मोक्षिता हेमकुमार रेड्डी (वय ३, लक्ष्मी चौक, चिखली), धनंजय कुमार कोळी (वय ३०, रा. सोनवणे वस्ती, चिखली, मुळगाव जयसिंगपूर कोल्हापूर, रोहित ज्ञानेश्वर कदम (वय २५, रा. लोणी, तालुका खंडाळा जिल्हा सातारा)
ट्रक मधील दोघा मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही.
नवले पूलावर अपघात घडण्याचे कारण काय?
नवले पूलावर झालेला हा काही पहिला अपघात नाही, याआधीदेखील असे अपघात या ठिकाणी झाले आहेत. महामार्गाची चुकलेली रचना अपघातांचे मुख्य कारण असून साताऱ्याहून पुण्याला येताना कात्रज बोगद्यानंतर महामार्गाला तीव्र उतार आहे. याच ठिकाणी महामार्गावर धोकादायक वळण आहे, तसेच या ठिकाणीच दोन्ही बाजुंनी सर्व्हिस रोड महामार्गाला येऊन मिळतात. तेव्हा तीव्र उतार असल्याने अनेकदा अवजड वाहनांचं नियंत्रण सुटतं, समोरच्या वाहनांवर ती अवजड वाहनं जाऊन धडकतात आणि अपघात घडतो. अपघातानंतर महामार्ग प्राधिकरणाकडून तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातात, मात्र कोणताही कायमस्वरुपी तोडगा नाही, ही खेदाची बाब आहे. दरम्यान, एरवी लोकप्रतिनिधींचे भत्तेवाढ किंवा शासकीय निवासस्थानांच्या डागडुजीसाठी निधीबाबत एकमत होणाऱ्या लोकप्रतिनिधींनी लोकांचे जीव घेणाऱ्या या पुलावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी एकमताने पावलं टाकावीत, अशी अपेक्षा पुणेकरांकडून व्यक्त होत आहे.
Horror Crash Near Navale Bridge
महत्वाच्या बातम्या
- District Collector : निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
- Shiv Sena, : शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणी पुढील वर्षी जानेवारीमध्ये
- कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र, ड्रग प्रकरणातील आरोपींच्या भाजप प्रवेशावरून नाना पटोले यांचा सवाल
- काेरेगाव पार्क जमीन प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा, अंजली दमानिया यांची मागणी



















