विशेष प्रतिनिधी,
पुणे : Bapusaheb Pathare : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षातून (भाजप) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केलेले बापू पठारे यांनी वडगाव शेरी मतदारसंघातून विजय मिळवला. विरोधी पक्षात असणारे बापू पठारे यांचे सत्ताधारी महायुतीशी असलेले ऋणानुबंध लपून राहिलेले नाहीत. त्यांचे पुत्र सुरेंद्र पठारे हे भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू आहे. यावर आता भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात महाविकास आघाडीला भरघोस यश मिळाले. अशाच प्रकारची कामगिरी विधानसभा निवडणुकीतही होईल आणि आपल्या वाट्याला काहीतरी मिळेल, या आशेने अनेकांनी महाविकास आघाडीशी जाण्याचा मार्ग निवडला. यातच भाजपकडून उमेदवारी नाकारली गेलेले बापू पठारे यांनी शरद पवार यांची तुतारी हातात घेतली. विधानसभा निवडणुकीत त्यांनी सुनील टिंगरे यांचा पराभव करत आमदारकी मिळवली. परंतु, महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षासोबत राहण्याची बापू पठारे यांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. विरोधी पक्षात राहून कामे होत नसल्याने ते अनेकदा सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांसोबत दिसून येतात. भाजपमधील त्यांचे अनेक ऋणानुबंध लपून राहिलेले नाहीत. मागील काही दिवसांपासून बापू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांच्यासह त्यांचा पुतण्या आणि भाचा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
बापू पठारे आणि सुरेंद्र पठारे यांची शहरातील काही प्रभागांवर मजबूत पकड आहे. महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून त्यांची ताकद काही नगरसेवकांच्या रूपाने दिसून येते. दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरेंद्र पठारे आणि त्यांच्यासोबत इतर काही जण भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा होती. मात्र, असे काही घडलेले दिसून आले नाही. याबाबत भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, पक्षात कोण प्रवेश करू इच्छित असेल, तर त्याचे स्वागत आहे. परंतु, पक्षात प्रवेश केल्यानंतर लगेचच निवडणुकीचे तिकीट मिळेल, असे नाही. ज्या भागात भाजपची ताकद कमी आहे आणि जिथे भाजपकडून प्रबळ दावेदार नाहीत, अशा ठिकाणी इतर पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तींचा विचार केला जाऊ शकतो. मात्र, पक्षात कोणाला सामील करून घ्यायचे किंवा नाही, हा निर्णय प्रादेशिक पातळीवरील पदाधिकारी घेतील. बापू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे भाजपमध्ये येणार का, याबाबत अद्याप आपल्याला शहराध्यक्ष म्हणून कोणतीही माहिती नाही, असे धीरज घाटे यांनी स्पष्ट केले. सध्या तरी आमदार पुत्राच्या पक्षप्रवेशाच्या बातम्यांना कोणतेही तथ्य नाही, असेही धीरज घाटे यांनी स्पष्ट केले आहे.
दसऱ्याच्या मुहूर्तावर होणारा हा पक्षांतराचा प्रयत्न का टळला आणि तो पुन्हा होणार आहे की नाही, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता दिसून येत नाही.
Bapusaheb Pathare : Why was the MLA’s son’s border violation on Dussehra avoided? What did the city chief say..
महत्वाच्या बातम्या
- Ravindra Dhangekar चंद्रकांतदादा गुन्हेगारांना पाठीशी का घालतात, रवींद्र धंगेकरांचा थेट सवाल
- Uddhav Thackeray : मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? आत्मचिंतन करा : एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
- Congress : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर आंदोलन करणार
- Ajit Pawar : अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट, तासभर चर्चा झाल्याने राजकीय खळबळ




















