गुरुवारच्या पावसानं महापालिकेचे वाभाडे काढले;ओढे-नाल्यांवरील अतिक्रमणांवर अखेर हातोडा चालणार!

विशेष प्रतिनिधी

पुणे: शहरात गुरुवारी अवघ्या तासाभराच्या पावसाने महापालिकेच्या ‘मान्सूनपूर्व’ तयारीचे वाभाडे काढले. रस्ते जलमय झाले, झाडे कोसळली आणि दुर्दैवाने एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर आता कुठे कुंभकर्णी झोपेतून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने शहरात तातडीने उपाययोजना राबविण्याचा ‘साक्षात्कार’ झाला आहे. PMC Wakes

शहरातील नैसर्गिक जलप्रवाह रोखणारी अतिक्रमणे हटवणे, नाले सफाई आणि धोकादायक फांद्यांची छाटणी आता ‘युद्धपातळीवर’ करणार असल्याची घोषणा महापौर मंजूषा नागपुरे आणि आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत केली.

पालिका प्रशासनाचे महत्त्वाचे निर्णय

अतिक्रमणांचा अडथळा दूर होणार: ओढे आणि नाल्यांच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा ठरणारी बांधकामे जमीनदोस्त केली जाणार आहेत.

127 ‘क्रॉनिक स्पॉट्‌‍स’वर लक्ष: शहरात जिथे दरवर्षी पाणी साचते, अशा १२७ ठिकाणांची ओळख पटली असून, तिथे जूनपूर्वी मोठ्या व्यासाच्या पावसाळी वाहिन्या (Storm Water Lines) टाकण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

क्षमतेचा प्रश्न: सध्या शहरात केवळ १५% रस्त्यांवर पावसाळी गटारे आहेत, ज्यांची क्षमता तासाला ५०-६० मि.मी. पावसाची आहे. मात्र, बदलत्या निसर्गचक्रामुळे तासाला १०० मि.मी. पाऊस झेलण्याची क्षमता निर्माण करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे.

23 गावांसाठी 2,200 कोटींचा कागदी ‘आराखडा’

शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या विकासासाठी पालिकेने तब्बल २,२०० कोटी रुपयांचा भव्य आराखडा तयार केला आहे. केंद्र सरकारच्या नव्या नियमावलीनुसार हा प्लॅन बनवण्यात आला असून, निधीसाठी आता राज्य आणि केंद्र सरकारकडे पदर पसरले जाणार आहेत. आयुक्तांचे स्पष्टीकरण:



“भविष्यात रस्ते बांधताना केवळ वरवरचा डांबर टाकला जाणार नाही. रस्ते बांधतानाच पावसाळी गटारे, ड्रेनेज, पाणीपुरवठा आणि केबल डक्ट या सर्व सुविधांचे काम एकाच वेळी केले जाईल,” असे आश्वासन आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहे.

उशीर झालाय, पण अंमलबजावणी होणार का?

अवकाळी पावसाने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचे धिंडवडे काढले आहेत. सिंहगड रस्त्यावर झाडाची फांदी पडून झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपये नालेसफाईवर खर्च होतात, तरीही पावसाळ्यात पुणे तुंबतेच. आता महापौरांनी ‘युद्धपातळीवर’ कामाचे आदेश दिले असले, तरी प्रत्यक्ष जमिनीवर किती काम होते आणि किती केवळ कागदावर राहते, हे येणारा मान्सूनच ठरवेल.

PMC Wakes Up After Tragedy! Encroachments on Streams and Culverts Finally to be Axed

महत्वाच्या बातम्या