विशेष प्रतिनिधी
पुणे:शहरातील पोलीस दलात शिस्तभंगाच्या घटनांवर लगाम घालण्यासाठी कठोर भूमिका घेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवघ्या पाच दिवसांत ८ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करत मोठा धडाका लावला आहे. खंडणी, दमदाटी, मद्यप्राशन आणि अधिकाराचा गैरवापर अशा गंभीर आरोपांमुळे ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
२ एप्रिल रोजी वाघोली पोलिस ठाण्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी आयटी इंजिनियरला धमकावले होते. आयटी इंजिनियर तरुण आणि तरुणीला धमका व त्यांच्याकडून खंडणी उकळण्यात आली होती. आयटी इंजिनियर तरुणाला पोलिसांनी मारहाण करत १० हजार ऑनलाईन उकळले होते.याप्रकरणात वाघोली पोलिस ठाण्यातील ३ पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
तर दुसऱ्या घटनेत चक्क पोलिसांकडून जोडप्याचा छळ करण्याचा प्रकार उघडकीस आला होता.रात्री तुमच्या फ्लॅट मधून आवाज येतो म्हणून पोलिसांकडून सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या जोडप्याला ताब्यात घेतले.सदरील जोडप्याला पोलिस स्टेशन मध्ये नेऊन पैश्यांची मागणी करत QR कोड स्कॅन करत पैसे भरण्यास भाग पाडले.पोलिसांकडून अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
तर तिसऱ्या घटनेत संबंधित हवालदारांनी ड्युटीवर असतानाच मद्यप्राशन केले होते. याशिवाय, पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान गैरवर्तन केल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, पोलीस ठाण्याच्या परिसरातच वाहन चालवताना एका महिला तक्रारदाराला धडक दिल्याची घटना घडली.या घटनेची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली.
अगदी दोन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या प्रकरणानंतर संपूर्ण पुणे पोलिस प्रशासन हादरून गेले होते.खोट्या POCSO गुन्हा दाखल करण्याची धमकी देत एका व्यक्तींकडून ७ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी तीन पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिस उपनिरीक्षक अजित बडे,पोलिस कर्मचारी सुदाम तायडे आणि दामिनी पथकातील कर्मचारी सोनाली हिंगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ह्या प्रकरणात लक्ष घालत आरोपींवर निलंबनाची कारवाई केली आहे.
आयुक्त अमितेश कुमार ऍक्शन मोडवर
मागील ५ दिवसात पुणे शहरात विविध प्रकरणांमध्ये ८ पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.या सर्व घटनांमध्ये आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः लक्ष घालून कारवाईचे निर्देश दिले.सामान्य नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यास निलंबनाच्या कारवाईचा इशारा आयुक्त अमितेश कुमारांकडून अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.
पुण्यातील या घटनांनी कायदा राखणाऱ्या यंत्रणेतच गैरप्रकार होत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे मात्र, आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व प्रकरणांची दखल घेत केलेली तातडीची कारवाई ही सकारात्मक बाब मानली जात असून, भविष्यात अशा प्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
8 policemen suspended in 5 days in Pune! Commissioner Amitesh Kumar on action mode..