पुण्यात गाण्यावरून रणकंदन; माडवी हिडमा कोण होता?

विशेष प्रतिनिधी

पुणे:शहरातील विश्रांतवाडी परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव शासकीय वसतिगृहात घेण्यात आला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनी “ओ रे बंदूक वाले” या गाण्यावर नृत्य सादर केले. या गाण्यात माओवादी नेता मडवी हिडमा याचे कथित गौरवगान असल्याचा आरोप होत आहे. कार्यक्रमादरम्यान तयार झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर हा मुद्दा वादाच्या केंद्रस्थानी आला.

समाज माध्यमांमध्ये व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर पोलिस आणि गुप्तचर यंत्रणांकडून घटनेची गंभीर दखल घेण्यात आली.समाज कल्याण विभागाकडून तातडीने या प्रकरणाची चौकशी करून,ज्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेल्या वस्तीगृह प्रशासन आणि विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात आली.



मडवी हिडमा कोण होता?

मडवी हिडमा हा भारतातील सर्वाधिक कुख्यात माओवादी नेत्यांपैकी एक मानला जात होता. छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील पुवर्ती गावचा रहिवासी असलेल्या हिडमाने 1996-97 च्या सुमारास, वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी माओवादी संघटनेत प्रवेश केला. संघटनेत दाखल झाल्यानंतर त्याने आपल्या कामकाज, शिस्त आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर जलद गतीने प्रगती करत CPI (माओवादी) च्या केंद्रीय समितीपर्यंत मजल मारली. तो माओवादी संघटनेच्या सशस्त्र विंग ‘पीपल्स लिबरेशन गोरिला आर्मी (PLGA)’ मध्ये सक्रिय होता आणि संघटनेच्या कारवायांमध्ये त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.

सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, हिडमा अनेक मोठ्या आणि घातक हल्ल्यांशी संबंधित होता. 2010 मधील दंतेवाडा हल्ल्यात 76 CRPF जवान शहीद झाले, तर 2013 च्या दरभा व्हॅली हल्ल्यात काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा मृत्यू झाला. याशिवाय 2017 मधील सुकमा हल्ल्यात 37 जवान शहीद झाल्याची नोंद आहे. या गंभीर घटनांमुळे हिडमाचे नाव देशातील सर्वाधिक वॉन्टेड माओवादी नेत्यांमध्ये घेतले जाऊ लागले होते आणि त्याच्यावर सुमारे 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

दरम्यान, 18 नोव्हेंबर 2025 रोजी आंध्र प्रदेशातील जंगल परिसरात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत हिडमा ठार झाला. या कारवाईत त्याची पत्नी मडकम राजे उर्फ राजक्का आणि इतर काही माओवादी सदस्य देखील मारले गेले. अनेक वर्षे सुरक्षा यंत्रणांना चकवा देणाऱ्या या कुख्यात माओवाद्याचा अखेर याच ऑपरेशनमध्ये मृत्यू झाला.

Fight over song in Pune; Who was Madvi Hidma?

महत्वाच्या बातम्या