विशेष प्रतिनिधी
पुणे: राज्यात १२ मे रोजी विधानपरिषदेसाठी मतदान पार पडणार आहे,त्यासाठी २३ एप्रिल रोजी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे.संख्याबळानुसार भाजपाला पाच,शिवसेना शिंदे गट दोन,राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक तर उर्वरित एक जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेची निवडणूक प्रचंड चुरशीची होणार असल्याचे बोलले जात आहे.महायुती आणि महाविकास आघाडी मधून इच्छुकांनी लॉबिंग सुरू केली आहे. अशातच शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून अनेक पदाधिकारी इच्छुक असल्याचे पाहायला मिळत आहे,मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानपरिषदेसाठी ‘ धक्कातंत्रा ‘ची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे गटाकडून माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनाच विधान परिषदेसाठी ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.बच्चू कडू आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट झाल्याची देखील चर्चा आहे.
बच्चू कडू यांनी अगोदरपासूनच एकनाथ शिंदे यांच्या बंडाला पाठिंबा दर्शवत,सुरुवातीच्या काळात त्यांची साथ दिली होती.परंतु,नंतरच्या काळात बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेच्या काही भूमिकांवर, महत्वाचं म्हणजे शिंदे यांच्याकडून करण्यात आलेल्या शिवसेनेच्या दाव्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.शिवसेनेवर आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा टाळायला हवा होता, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं होतं.
समतोल राखण्याचा प्रयत्न..
बच्चू कडू यांच्या पक्षाचे आमदार राजकुमार पटेल यांनी २०२४ मध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता,या प्रवेशामुळे शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात वाद निर्माण झाला होता.त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून बच्चू कडूंना विधानपरिषदेची ऑफर देण्यात आल्याचं बोलल जात आहे.महायुतीमधील जागावाटप आणि समतोल राखण्याचा उद्देश यामागे असल्याची चर्चा आहे.
शिंदेंकडून दुसऱ्या जागेसाठी ‘धक्कातंत्र ‘
महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या दोन जागांपैकी एक जागा पुण्याला मिळण्याची शक्यता आहे.विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे नाव चर्चेत आहे.मात्र,एकनाथ शिंदे यांच्या ‘ धक्कातंत्रा ‘ मुळे इतर काही नाव पुढे येऊ शकतात.रविंद्र धंगेकर, डॉ.रोहित टिळक आणि शहर अध्यक्ष असलेले नाना भानगिरे हे पुण्यातून प्रयत्न करत आहेत.
एकूणच एकनाथ शिंदे यांनी दिलेली ऑफरवर बच्चू कडू यांच्याकडून विचार केला जाणार का,हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Eknath Shinde’s shock tactics; Former minister Bachchu Kadu offered the Legislative Council seat..
महत्वाच्या बातम्या