महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्ती; सरकारकडून मिळणार मराठीचे धडे!

विशेष प्रतिनिधी

पुणे: राज्यात महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच १ मे २०२६ पासून राज्यभरातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य असणार आहे.परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली आहे.निर्णयानुसार, आता रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे बंधनकारक आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.मराठी न येणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील सर्व ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तपासणी मोहीम राबवली जाणार आहे.या मोहिमेद्वारे चालकांना मराठी भाषा येते का, याची तपासणी केली जाणार आहे.अधिकाऱ्यांकडून परवाना नूतनीकरण, तपासणी आणि प्रक्रियेदरम्यान भाषेची पडताळणी केली जाणार आहे.



सरकारकडून मिळणार मराठीचे प्रशिक्षण

राज्य सरकारकडून चालकांसाठी विशेष मराठी प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करण्याची तयारी सुरू आहे.या प्रशिक्षणाद्वारे बाहेरून आलेल्या चालकांना मराठी भाषेचे ज्ञान दिले जाणार आहे,बाहेरून आलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना स्थानिक भाषेशी जुळवून घेण्यास मदत होईल,असे सरकारचे म्हणणे आहे.

रिक्षा – टॅक्सी चालक संघटनांचा विरोध

दरम्यान,या निर्णयामुळे वाद निर्माण झाला आहे.रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांकडून या निर्णयाला तीव्र विरोध होत आहे.चालकांच्या मते राज्यातील ६० ते ७० टक्के चालक हे उत्तर भारतीय आहेत.अचानक मराठी भाषा बोलण्याची सक्ती केल्यास त्यांचा दिवसभराच्या रोजगारावर मोठा परिणाम होऊ शकतो.महाराष्ट्राच्या बाहेरील अनेक चालकांना कमी वेळेत मराठी भाषा शिकणे कठीण जाईल,त्यामुळे चालकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर विविध चालक संघटनांनी सरकारला हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्यात आला असून, या मुद्द्यावर मोठा संघर्ष पाहायला मिळू शकतो.

Marathi mandatory for rickshaw-taxi drivers from Maharashtra Day; Marathi lessons will be provided by the government!

महत्वाच्या बातम्या