विशेष प्रतिनिधी
मुंबई: नाशिकमधील बहुचर्चित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली असून उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे-पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी या कारवाईची घोषणा केली. या निर्णयामुळे राज्यातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
भोंदूबाबा अशोक खरात आणि अभिजीत भांडे-पाटील यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचे आरोप समोर आले होते. विशेष म्हणजे, नाशिकच्या पाथर्डी शिवारातील ४० गुंठे जमिनीच्या सातबाऱ्यावर भांडे-पाटील यांच्या पत्नीचे आणि अशोक खरात यांच्या मुलीचे नाव असल्याची माहिती तपासात पुढे आली. या जमिनीतील भागीदारीमुळे दोघांमधील आर्थिक संबंध अधिक गडद असल्याची चर्चा रंगली आहे.
तपास यंत्रणांच्या हाती लागलेल्या कॉल रेकॉर्ड्समुळेही या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. अशोक खरात आणि अभिजीत भांडे-पाटील यांच्यात तब्बल १४३ वेळा फोनवर संभाषण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी ८३ कॉल स्वतः खरात यांनी केले होते, तर ६० कॉल भांडे-पाटील यांनी केल्याचे सांगितले जात आहे. या संपर्कामुळे दोघांमधील संबंधांवर संशय अधिक गडद झाला आहे.
महसूल विभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, संघटित गुन्हेगारी, फसवणूक आणि शोषणाचे आरोप असलेल्या व्यक्तीसोबत निकट संबंध ठेवणे, गोपनीय माहिती लीक करणे, पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर फायदा पोहोचवणे आणि आर्थिक लाभ मिळवणे, या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. प्राथमिक चौकशीत हे आरोप प्रथमदर्शनी गंभीर स्वरूपाचे वाटल्याने महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून, चौकशी पूर्ण होईपर्यंत भांडे-पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे आधीच अनेक राजकीय नेते आणि प्रभावशाली व्यक्ती अडचणीत आले आहेत. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची देखील ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. खरातशी संबंधित आर्थिक व्यवहार, जमिनींचे व्यवहार आणि कथित आर्थिक गैरव्यवहार यांचा तपास विविध यंत्रणांकडून सुरू आहे.
अशोक खरात प्रकरणात यापूर्वीही अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. शिर्डी विमानतळ परिसरातील जमिनीचे व्यवहार, संशयास्पद गुंतवणूक, कार्यालयांवरील झाडाझडती, बँक खाती गोठवणे अशा कारवायांमुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे. आता प्रशासकीय अधिकाऱ्यांवर थेट कारवाई झाल्याने तपास आणखी मोठ्या लोकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Deputy Collector Abhijit Bhande-Patil suspended in Ashok Kharat case
महत्वाच्या बातम्या
- १०५ दिवसांत मराठी शिका, अन्यथा १६ ऑगस्टपासून कारवाई; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा
- काँग्रेसने द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला; तमिळनाडूतील सत्तांतरावर मोदींचा हल्लाबोल
- अशोक खरात प्रकरणात चार मंत्र्यांवर गंभीर आरोप, नाना पटोलेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी
- भोंदू अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांची एसआयटीसमोर चौकशी