हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याप्रकरणात संशयित आरोपी शिवाजी राठोड याला नागपूरमध्ये अटक

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुण्यातील हडपसर येथील उषाकिरण हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) एका संशयित आरोपीला नागपूर रेल्वे जंक्शन येथून ताब्यात घेतले आहे. शिवाजी राठोड असे संशयित आरोपीचे नाव आहे.

राठोड आझाद हिंद एक्सप्रेसने प्रवास करत होता. ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर आली असता, तो गाडीतून उतरत असतानाच आधीच सज्ज असलेल्या एटीएसच्या पथकाने त्याला चहुबाजूंनी घेरून ताब्यात घेतले. सध्या या आरोपीला नागपूर एटीएसच्या कार्यालयात आणण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.



ही घटना बुधवारी (13 मे) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास उघडकीस आली. हडपसर येथील कामधेनू इस्टेटमधील ‘उषाकीरण हॉस्पिटल’मध्ये ही घटना घडली. हॉस्पिटलचे ॲडमीन कॉर्डीनेटर प्रमोद भागवत भालके (वय 28) आणि डॉ. विलास गायकवाड हे पहिल्या मजल्यावर रुग्णांची तपासणी करत असताना, त्यांना अतिदक्षता विभागाजवळील स्वच्छतागृहाचा लाईट सुरू दिसला.

लाईट बंद करण्यासाठी गेले असता, डॉ. गायकवाड यांना वॉश बेसिनच्या खाली एक संशयास्पद वस्तू आढळली. पांढऱ्या रंगाच्या चार नळकांड्या वायरच्या साहाय्याने एका इलेक्ट्रीक घड्याळाला जोडलेल्या होत्या आणि त्यातून ‘टिक-टिक’ असा आवाज येत होता. डॉ. गायकवाड यांनी ती वस्तू उचलून एका रिकाम्या सलाईनच्या बॉक्समध्ये ठेवली. त्यानंतर भालके यांनी तो बॉक्स तातडीने हॉस्पिटलबाहेरील मोकळ्या जागेत नेऊन ठेवला. घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिस, बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि एटीएसने घटनास्थळी धाव घेतली. रात्री नऊच्या सुमारास बॉम्ब शोधक पथकाने ही वस्तू ग्लायडींग सेंटर येथे नेऊन सुरक्षितपणे निकामी केली.

या संवेदनशील प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी परिसरातील 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले होते. संशयास्पद हालचालींवरून 15 ते 18 जणांची कसून चौकशीही करण्यात आली होती. अखेर तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीच्या चेहऱ्यावरून पडदा उठला आणि त्याचे लोकेशन नागपूरमध्ये ट्रॅक झाले.

Shivaji Rathod, a suspect in the hospital bomb case, was arrested in Nagpur.

महत्वाच्या बातम्या