विशेष प्रतिनिधी
जालना:मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीसंदर्भात सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबई आंदोलनावेळी सातारा गॅझेटचा जीआर एका महिन्यात काढण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. मात्र तब्बल आठ महिने उलटूनही त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करत जरांगे पाटील यांनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात हैदराबाद गॅझेटप्रमाणेच सातारा संस्थानाच्या गॅझेटलाही मान्यता देण्यात यावी, ही मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने केली जात आहे. या गॅझेटमधील नोंदींच्या आधारे अनेक मराठा कुटुंबांना कुणबी म्हणून मान्यता मिळू शकते, असा आंदोलकांचा दावा आहे. मात्र सरकारने या विषयावर केवळ आश्वासने दिली, प्रत्यक्ष निर्णय घेतला नाही, अशी टीका जरांगे यांनी केली.
मनोज जरांगे म्हणाले की,’ “फडणवीसांनी मराठा समाजाचं वाटोळं केलं आहे. मराठा समाजाला न्याय देण्याऐवजी त्रास देण्याचे काम सुरू आहे,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. सरकारकडून वेळकाढूपणा केला जात असून मराठा समाजाच्या भावना दुर्लक्षित केल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, सरकारने सातारा गॅझेटची अंमलबजावणी तातडीने केली नाही तर जून महिन्यात पुन्हा उपोषण सुरू करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. “मराठा समाजाच्या संयमाची परीक्षा सरकारने पाहू नये. आता समाजात प्रचंड संताप आहे,” असे ते म्हणाले.
मराठा समाज आता मागे हटणार नाही असे स्पष्ट करत,आंदोलनाची पुढील तारीख शनिवारी जाहीर केली जाईल असे त्यांनी सांगितले.
Even after eight months, no GR; Manoj Jarange aggressive regarding Satara Gazette
महत्वाच्या बातम्या
- १०५ दिवसांत मराठी शिका, अन्यथा १६ ऑगस्टपासून कारवाई; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा
- काँग्रेसने द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला; तमिळनाडूतील सत्तांतरावर मोदींचा हल्लाबोल
- अशोक खरात प्रकरणात चार मंत्र्यांवर गंभीर आरोप, नाना पटोलेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी
- भोंदू अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांची एसआयटीसमोर चौकशी