विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी वित्तीय वर्ष 2025-26 साठी महाराष्ट्र राज्याला राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) अंतर्गत केंद्राच्या हिस्स्यातील दुसऱ्या हप्त्याद्वारे 1,566.40 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीचा उद्देश म्हणजे यंदाच्या मान्सूनदरम्यान अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्या नागरिकांना तात्काळ मदत आणि पुनर्वसनासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.
केंद्र सरकारने स्पष्ट केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नैसर्गिक आपत्तींच्या काळात राज्य शासनांना सर्वतोपरी पाठबळ देण्याचा सरकारचा संकल्प आहे. गृह मंत्रालयाच्या शिफारसीनुसार हा निधी मंजूर करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारने एकूण 27 राज्यांना SDRF अंतर्गत 13,603.20 कोटी रुपये, तसेच 15 राज्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) मधून 2,189.28 कोटी रुपये वितरित केले आहेत. याशिवाय, राज्य आपत्ती न्यूनीकरण निधी (SDMF) मधून 21 राज्यांना 4,571.30 कोटी रुपये, आणि राष्ट्रीय आपत्ती न्यूनीकरण निधी (NDMF) मधून 9 राज्यांना 372.09 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
पूर, भूस्खलन आणि ढगफुटी यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या राज्यांना सर्वतोपरी सहाय्य देण्यासाठी केंद्र सरकारने सर्वंकष उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यंदाच्या मान्सून काळात महाराष्ट्रासह देशभरातील 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) विक्रमी 199 तुकड्या तैनात करण्यात आल्या. तसेच सैन्य आणि वायुसेनेच्या माध्यमातून बचावकार्य व मदतकार्याला गती देण्यात आली.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली असून, अनेक भागात नद्या-नाल्यांना पूर आला. या आपत्तीमुळे घरांचे, शेतीचे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची उभी पिके वाहून गेली, तर काही ठिकाणी जमिनी खरवडून 15 ते 20 फूट खोल खड्डे पडले. परिणामी, शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत.
राज्य सरकारकडून मदत जाहीर झाली असली, तरी ती अपुरी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे केंद्राकडून मंजूर झालेला हा 1,566 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांना व आपत्तीग्रस्त नागरिकांना मोठा दिलासा देणारा ठरणार आहे.
Maharashtra gets Rs 1,566 crore relief from the Centre under the State Disaster Response Fund
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा