विशेष प्रतिनिधी
धाराशिव: राज्यात खळबळ उडवणाऱ्या आणि दोन दशकांपासून चर्चेत असलेल्या पवनराजे निंबाळकर व त्यांच्या चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडाचा निकाल अखेर जाहीर होणार आहे. मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयाने 14 मे ही निकालाची तारीख निश्चित केली असून, तब्बल 20 वर्षांनंतर या प्रकरणाचा अंतिम निर्णय समोर येणार आहे.
या प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री तथा माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण 9 जण आरोपी आहेत. त्यामुळे या निकालाकडे केवळ धाराशिव नव्हे, तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 20 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीवेळी डॉ. पाटील यांच्यासह 7 आरोपी न्यायालयात हजर होते.
प्रकरण नेमकं काय?
धाराशिव मधील जेष्ठ नेते पवनराजे निंबाळकर यांची ३ जून २००६ रोजी हत्या करण्यात आली होती.मुंबईतील कळंबोली नाका येथे शूटर पारसमलने पवनराजे निंबाळकर आणि त्यांचा चालक समद काझी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.हत्याकांडाचा ३ वर्षानंतर म्हणजेच ६ जून २००९ रोजी पद्मसिंह पाटील यांना खासदार पदावर असताना सीबीआयने अटक केली.
हत्याकांडांच्या तपासा दरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आले. हत्याकांड घडवून आणण्यासाठी २५ लाखांची सुपारी देण्यात आली होती.यामध्ये काही शूटर आणि मध्यस्थींची भूमिका उघड झाली होती.तसेच,हत्या करण्यासाठी अमेरिकन आणि चीन बनावटीचे शस्त्र वापरण्यात आल्याचे तपासात समोर आले होते.
महाराष्ट्र पोलिस, सीआयडी आणि त्यानंतर सीबीआयकडून तपास करण्यात आल्यानंतर, जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंसह १२८ साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात आला.१६ महिने कट रचून २५ लाखांची सुपारी देऊन दुहेरी हत्याकांड घडवून आणल्याचा सीबीआयचा आरोप आहे.
4 जुलै 2011 पासून सुरू असलेली ही सुनावणी मागील 14 वर्षांपासून सुरू आहे. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या वतीने तब्बल 1250 पानांचे लेखी म्हणणे न्यायालयात सादर करण्यात आले असून, त्यामध्ये पवनराजे यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
सीबीआयने आपल्या दोषारोपपत्रात नमूद केल्याप्रमाणे, राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण झाल्यामुळे डॉ. पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे आणि मोहन शुक्ला यांनी 25 लाखांची सुपारी देऊन हा खून घडवून आणल्याचा आरोप आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये डॉ. पद्मसिंह पाटील, पारसमल जैन बादला, दिनेश तिवारी, मोहन शुक्ला, सतीश मंदाडे, पिंटू सिंग, कैलास यादव, शशिकांत कुलकर्णी आणि छोटे पांडे यांचा समावेश आहे.
दोन दशकांपासून चर्चेत असलेल्या या हत्याकांडाचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. न्यायालयाच्या निर्णयाने या प्रकरणातील अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे.
Pawan Raje Nimbalkar double murder case verdict on May 14; ‘Judgement Day’ after twenty years…
महत्वाच्या बातम्या