पेट्रोल बचतीच्या आवाहनावरून राज ठाकरेंचा मोदी सरकारवर निशाणा, “मन की बात नव्हे, अर्थतज्ज्ञांचे ही ऐका”

विशेष प्रतिनिधी

मुंबई : पेट्रोलची बचत करा, सोन्याची खरेदी टाळा आणि शक्य असल्यास ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय स्वीकारा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधानांवर जोरदार टीका केली आहे. देशातील आर्थिक परिस्थिती, रुपयाचे अवमूल्यन, वाढती महागाई आणि संभाव्य इंधन दरवाढ यावर प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी सरकारने जनतेसमोर स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी केली आहे.

राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या काळाचा उल्लेख करत, पाकिस्तान युद्धाच्या वेळी शास्त्रींनी केलेल्या आवाहनाची आठवण करून दिली. “शास्त्रीजींनी जनतेला आवाहन केले होते, पण त्याआधी त्यांनी स्वतः त्याची अंमलबजावणी केली होती. आज पंतप्रधान आणि त्यांच्या पक्षातील नेते स्वतः काटकसर करतील का?” असा सवाल त्यांनी केला.

राज ठाकरे यांनी पुढे म्हटले की, सरकारकडून पेट्रोल-डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढविण्याची पूर्वतयारी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. “दर वाढल्यानंतर लोक नाइलाजाने वापर कमी करतीलच. पण नैतिकतेचे आवाहन करून त्याचा सर्व भार जनतेवर टाकण्याचे प्रकार आता थांबले पाहिजेत.



देशाची अर्थव्यवस्था “वरून मजबूत पण आतून कमकुवत” झाल्याचा दावा करत त्यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवरही टीका केली. “इराण-इस्रायल संघर्षावर सर्व खापर फोडू नका. पंतप्रधान झाल्यापासून रुपयाचे मोठ्या प्रमाणात अवमूल्यन झाले, त्यामागची कारणे देशाला सांगा,” अशी मागणी त्यांनी केली.

रिझर्व्ह बँकेच्या तीन गव्हर्नर्सनी मोदी सरकारच्या कार्यकाळात राजीनामे दिल्याचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले की, “माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे स्वतः अर्थतज्ज्ञ आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. ते तज्ज्ञांशी चर्चा करत, त्यांचे ऐकून घेत. पण आज सरकारकडून तज्ज्ञांच्या मतांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.”

त्यांनी संसदेत विशेष अधिवेशन बोलावून देशाच्या आर्थिक परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्याची मागणी केली. “जनतेला आणि संसदेला सरकारने सांगावे की ही परिस्थिती का निर्माण झाली आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणती पावले उचलली जाणार आहेत,” असे ते म्हणाले.

राज ठाकरे यांनी सरकारच्या काही निर्णयांचे समर्थन केल्याचाही उल्लेख करत, “आमचा विरोध कायम राहिला असला तरी देशहिताच्या प्रश्नावर आम्ही शत्रू नाही. पण त्यामुळे सरकारला प्रश्न विचारायचे नाहीत, असे होणार नाही,” असे स्पष्ट केले.
पंतप्रधानांनी स्वतःच्या पक्षापासून काटकसरीची सुरुवात करावी आणि देशातील आर्थिक संकटावर सरकारचा स्पष्ट रोडमॅप जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.

Raj Thackeray targets Modi government over fuel-saving appeal

महत्वाच्या बातम्या