पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी आज निकाल; तब्बल 20 वर्षांनंतर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्याचे माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह नऊ आरोपींविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी आज अखेर निकाल जाहीर होणार आहे. तब्बल दोन दशकांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाचा निकाल मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालय देणार असून, राजकीय वर्तुळासह संपूर्ण राज्याचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रभावशाली राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या पवनराजे निंबाळकर यांची 3 जून 2006 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. परंडा-कळंब मार्गावर अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनावर गोळीबार करत त्यांची हत्या केली होती. या घटनेने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. निंबाळकर यांच्यासोबत असलेले चालकही या हल्ल्यात ठार झाले होते.

सुरुवातीला स्थानिक पोलिसांकडून तपास करण्यात आला. मात्र या प्रकरणातील राजकीय संवेदनशीलता आणि गंभीरता लक्षात घेता नंतर तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आला. तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. पद्मसिंह पाटील यांचे मावसभाऊ असलेले पवनराजे निंबाळकर यांची मोठी राजकीय ताकद होती. त्यांचे पुत्र ओमराजे निंबाळकर हे सध्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आहेत.

सीबीआयने 6 जून 2009 रोजी तत्कालीन माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांना अटक केली होती. तपास यंत्रणेनुसार, राजकीय वैमनस्यातून ही हत्या घडवून आणल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणात पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण नऊ जणांविरुद्ध सीबीआयने आरोपपत्र दाखल केले होते

गेल्या अनेक वर्षांपासून या खटल्याची सुनावणी सुरू होती. साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक पुरावे, कॉल रेकॉर्ड्स, आर्थिक व्यवहार तसेच कथित कट रचल्याच्या आरोपांवर न्यायालयात विस्तृत युक्तिवाद झाले. या खटल्यादरम्यान अनेकदा सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे या निकालाकडे केवळ निंबाळकर कुटुंबीयच नव्हे तर राज्यातील राजकीय निरीक्षकांचेही लक्ष लागले आहे.

आज होणाऱ्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबई सत्र न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संभाव्य गर्दी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
या निकालामुळे दोन दशकांपासून चर्चेत असलेल्या या हत्याप्रकरणाचा न्यायालयीन अध्याय संपुष्टात येणार असून, राज्याच्या राजकारणावरही त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Verdict today in Pawanraje Nimbalkar murder case after 20 years

महत्वाच्या बातम्या