नवरी मिळेना म्हणून लढवली शक्कल; थेट पोलीस भरतीचेच लावले बॅनर!

विशेष प्रतिनिधी

पुणे: “पुणे तिथे काय उणे” असं उगीच म्हटलं जात नाही, पण पुण्यात सध्या एका तरुणाने लग्नासाठी जे काही केलं, ते पाहून स्वतः पोलीसही चक्रावले आहेत. बेरोजगारी आणि लग्नासाठी घातल्या जाणाऱ्या अटी यातून मार्ग काढण्यासाठी नऱ्हे येथील एका तरुणाने चक्क ‘खाकी’चा आधार घेतला. पण त्याचा हा रुबाब फार काळ टिकला नाही आणि लग्नाच्या बोहल्यावर चढण्याऐवजी या तरुणाला आता पोलीस कोठडीची हवा खावी लागत आहे.

नेमकं प्रकरण काय?

नऱ्हे परिसरातील ऋषिकेश जाधव या तरुणाचे अनेक दिवसांपासून लग्न जमत नव्हते. त्यातच त्याचे एका घटस्फोटीत महिलेवर प्रेम होते. मात्र, तिथेही ‘सरकारी नोकरी’ची अट आडवी येत होती. लग्नासाठी वारंवार नकार मिळत असल्याने ऋषिकेशने एक भलतीच शक्कल लढवली. त्याने आपण पोलीस दलात भरती झाल्याचा बनाव रचला.

पेढे वाटले, बॅनर लावले पण…

केवळ सांगून लोक विश्वास ठेवणार नाहीत, हे ओळखून या पठ्ठ्याने परिसरात आपण पोलीस झाल्याचे मोठे बॅनर लावले. एवढ्यावरच न थांबता, पोलिसांचा गणवेश घालून फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर स्टेट्स म्हणून ठेवले. परिसरात आनंदाने पेढेही वाटण्यात आले. नातेवाईक आणि मित्रमंडळींमध्ये ‘भाऊ पोलीस झाले’ अशी चर्चा सुरू झाली. त्याला वाटलं आता आपलं लग्न आरामात जमेल, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं.



असा फुटला भिंग

सरकारी नोकरीत लागल्याचे खोटे सांगणे आणि वर्दीचा गैरवापर करणे ऋषिकेशला महागात पडले. या प्रकरणाची माहिती मिळताच खऱ्या पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासाअंती हा सर्व प्रकार केवळ लग्नासाठी रचलेला बनाव असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ऋषिकेशवर गुन्हा दाखल केला आहे.

बेरोजगारीचं वास्तव की हतबलता ?

या घटनेनंतर समाजात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींना हा प्रकार मजेशीर वाटत असला, तरी यामागे तरुणांमधील बेरोजगारी आणि लग्नासाठी सामाजिक स्तरावर घातल्या जाणाऱ्या जाचक अटींचे भीषण वास्तव समोर आले आहे. नोकरी नाही म्हणून लग्न जमत नाही, या विवंचनेतून तरुण टोकाची पावले उचलत आहेत, ही चिंतेची बाब असल्याचे नागरिक बोलत आहेत.

थोडक्यात काय तर…

लग्नासाठी ‘शॉर्टकट’ शोधणाऱ्या या तरुणाचा डाव आता त्याच्या अंगाशी आला असून, पुण्यातील या ‘बनावट’ पोलिसाची गोष्ट सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.

A Ruse of Uniform to Win a Bride: Pune’s ‘Fake’ Cop Caught in His Own Trap!

महत्वाच्या बातम्या