पुणे मेट्रो आता कात्रज घाट ओलांडून आता थेट शिवापूरला धावणार ?

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणणारा स्वारगेट-कात्रज मेट्रोमार्ग पुढे शिवापूर टोलनाका परिसरातून प्रस्तावित रिंगरोडपर्यंत वाढविण्याच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावास पुणे महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने काल झालेल्या बैठकीत मंजुरी दिली. अंतिम निर्णयासाठी हा प्रस्ताव मुख्य सभेकडे शिफारस करण्यात आला आहे. Pune Metro

कात्रज घाट मार्ग हा पुणे शहराला सातारा, कोल्हापूर आणि दक्षिण महाराष्ट्राशी जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दळणवळणाचा रस्ता आहे. या मार्गावर दररोज प्रचंड प्रमाणात वाहनांची वाहतूक होत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. विशेषतः कात्रज आणि शिवापूर टोलनाका परिसरात ही समस्या अत्यंत गंभीर स्वरूपाची झाली आहे.



या संदर्भात नगरसेविका वर्षा तापकीर आणि तेजश्री बदक यांनी शहर सुधारणा समितीसमोर मांडला आहे. स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गाचा विस्तार शिवापूर टोलनाका ते प्रस्तावित रिंग रोडपर्यंत करण्यात आल्यास या भागातील नागरिकांना जलद, सुरक्षित आणि परवडणारी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होईल. यामुळे खासगी वाहनांचा वापर कमी होऊन वाहतूक कोंडीतून सुटका मिळेल आणि प्रदूषणही लक्षणीय प्रमाणात कमी होईल, असे प्रस्तवात सुचवले आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून, तो पुढील प्रक्रियेसाठी मुख्य सभेकडे शिफारस करण्यात आला आहे.

दक्षिण पुणे, कात्रज परिसर तसेच शिवापूर टोलनाका आणि प्रस्तावित रिंगरोडलगत झपाट्याने वाढणारी वसाहत व वाढता वाहतूक ताण लक्षात घेता मेट्रो विस्तार अत्यंत आवश्यक आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांना जलद, सुरक्षित व पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे.

प्रस्तावित रिंगरोडशी मेट्रोचे प्रभावी कनेक्टिव्हिटी निर्माण झाल्यास शहरातील वाहतूक वितरण अधिक संतुलित होईल आणि भविष्यातील शहरी नियोजनाला मोठी चालना मिळेल, असे शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षा स्मिता वस्ते यांनी नमूद केले.

या विस्तारामुळे कात्रजच्या लगत असलेल्या भागाला आणि, शिवापूर टोलनाका परिसर तसेच रिंगरोडलगतच्या विकसित होत असलेल्या भागांना मोठा फायदा होणार असून खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, शहर सुधारणा समितीने सदर प्रस्तावास मंजुरी देऊन अंतिम मान्यतेसाठी तो मुख्य सभेकडे शिफारस केला आहे, अशी माहिती समितीकडून देण्यात आली.

Breaking: Pune Metro’s expansion approved; to run from Katraj Ghat to Shivapur!

महत्वाच्या बातम्या