विशेष प्रतिनिधी
मुंबई : पुण्यातील नवले पुल परिसरात वारंवार होणारे अपघात कायमस्वरूपी रोखण्यासाठी त्या ठिकाणी एलिव्हेटेड रस्ता उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असून, या प्रकल्पाची अंदाजित किंमत सुमारे ६ हजार कोटी रुपये आहे. या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळेल, अशी माहिती राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. Navale Bridge
नवले पुल परिसरातील वाढत्या अपघातांचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करताना आमदार भीमराव तापकीर यांनी या भागातील वाहतूक कोंडी आणि वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे सांगितले. या प्रश्नावर उत्तर देताना राज्यमंत्री योगेश कदम यांनी सरकारकडून दीर्घकालीन उपाययोजना आखण्यात आल्याचे स्पष्ट केले.
त्यांनी सांगितले की, नवले पुल परिसरात सध्या वाहतुकीचा प्रचंड ताण असून, रस्त्याची रचना, उतार आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे अपघातांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे. ही समस्या तात्पुरत्या उपायांनी सुटणारी नसून कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने एलिव्हेटेड रस्त्याचा प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे.
या चर्चेदरम्यान आमदार शंकर जगताप आणि बापू पठारे यांनीही उपप्रश्न उपस्थित करत या भागातील वाहतूक व्यवस्थेचा आणि अपघातांच्या तीव्रतेचा मुद्दा अधोरेखित केला. त्यावर उत्तर देताना संबंधित प्रकल्पाला केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर कामाला गती दिली जाईल, असेही राज्यमंत्र्यांनी सांगितले.
नवले पूल हा पुणे शहरात प्रवेश करणाऱ्या महत्त्वाच्या मार्गांपैकी एक मानला जातो. या भागात जड वाहनांची सततची वर्दळ, उताराचा वेग आणि वाहतूक कोंडी यामुळे अपघात वारंवार घडत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. त्यामुळे एलिव्हेटेड रस्ता उभारणीचा प्रस्ताव प्रत्यक्षात मंजूर होऊन काम सुरू झाल्यास या भागातील नागरिक आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.