बीड कारागृहात कराड गॅंगची पुन्हा दहशत! बसण्याचा जागेवरून वाद, जेलरने धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल..

विशेष प्रतिनिधी

बीड: जिल्हा कारागृहातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीड जिल्हा कारागृहात वाल्मीक कराड गँगची दहशत पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे.सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात आरोपी असलेल्या सुदर्शन घुले,प्रतीक घुले आणि दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी शंकर शेप यांनी कारागृहात कैद्याला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.बाकावर बसण्याचा वादावरून अझर अब्दुल रहमान पठाण या कैद्याला मारहाण करण्यात आली.

या घटनेनंतर कारागृहातील सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

बसण्याचा जागेवरून वाद..

दरम्यान, जेलमधील बराकमध्ये बसण्याचा जागेवरून वाद झाला,वाद झाल्यानंतर प्रतीक घुले,सुदर्शन घुले आणि शंकर शेप यांनी अझर पठाण सोबत बाचाबाची करत मारहाण केली.



ऑडिओ क्लिपमुळे व्हायरल…

या प्रकरणातील कथित ऑडिओ क्लिपमध्ये मारहाण झालेल्या कैद्याने गंभीर आरोप केले आहेत. “माझ्या हाताला गंभीर मारहाण झाली. जेल प्रशासन माझं काहीही ऐकत नाही. त्यांनी पैसे घेतले आहेत. मला धमक्या दिल्या जात आहेत,” असा दावा त्या ऑडिओमध्ये करण्यात आला आहे.

सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि शंकर शेप या तिघांनी मला मारहाण केली. माझ्या हाताला गंभीर मारहाण झाली. जेल प्रशासन माझं काहीही ऐकून घेत नाही, त्यांनी पैसे खाल्ले आहेत. जेलर यांना याबाबत माहिती दिली, पण त्यांनी काहीही ऐकून घेतलं नाही. उलट माझ्यावर दमदाटी करून जेल बदली करण्याची धमकी दिली.याची तक्रार कुठेही करा, माझं काहीही वाकड होत नाही अशी धमकी जेलरने दिली. जेलमध्ये मारहाण करतानाचे सीसीटीव्ही फुटेज देखील आहे. मला दवाखान्यात देखील घेऊन जाण्यात आले नाही. वाल्मिक अण्णाकडे मला बोलावलं जात आहे, असं त्या कैद्याने सांगितल्याचं ऑडिओ क्लिपमधून समोर येत आहे.

एकूणच,कारागृहात देखील कराड गॅंगमधील आरोपींची दहशत कायम असल्याची चर्चा रंगत आहे. त्यामुळे कारागृहातील इतर कायद्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, कारागृह व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Karad gang terrorizes Beed jail again! Argument over seating, audio clip of jailer threatening goes viral..

महत्वाच्या बातम्या