“महा मेट्रोला आली जाग!”भूमिगत मार्गांवर “रूट मार्कर” बसवण्याचा निर्णय..

विशेष प्रतिनिधी

पुणे: शहरातील मेट्रो प्रकल्पाच्या कामांदरम्यान घडलेल्या काही धोकादायक घटनांच्या पार्श्वभूमीवर अखेर महामेट्रो प्रशासनाला जाग आली असून, शहरातील मेट्रो मार्गांच्या दोन्ही बाजूंना ‘रूट मार्कर’ बसवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे भविष्यातील अपघात टाळण्यास मोठी मदत होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

शहरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पात विशेषतः शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गावर काम सुरू आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात खोदकाम आणि भूमिगत बांधकाम सुरू असल्याने त्या परिसरात धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी अशाच एका घटनेत रस्त्यावरील खोदकामामुळे अपघाताचा धोका निर्माण झाल्याची बाब समोर आली होती. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.



या पार्श्वभूमीवर महामेट्रोने आता पुढाकार घेत शहरातील सर्व महत्त्वाच्या मेट्रो मार्गांवर ‘रूट मार्कर’ बसवण्याचे ठरवले आहे. हे मार्कर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लावण्यात येणार असून, त्याद्वारे खाली सुरू असलेल्या मेट्रोच्या भुयारी मार्गाची अचूक माहिती मिळणार आहे. विशेष म्हणजे, हे मार्कर जमिनीपासून सुमारे ७ मीटर अंतरावर बसवले जाणार आहेत, जेणेकरून ते सहजपणे नागरिकांच्या नजरेस पडतील.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक अतुल गाडगीळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात एमएनजीएल कंपनीकडून ज्या पद्धतीने भूमिगत गॅस वाहिन्यांवर मार्कर लावले जातात, त्याच धर्तीवर आता मेट्रो मार्गांवरही हे मार्कर बसवले जाणार आहेत. यामुळे कोणत्याही प्रकारच्या खोदकामापूर्वी संबंधित यंत्रणांना खाली मेट्रो मार्ग असल्याची माहिती मिळेल आणि संभाव्य धोके टाळता येतील.

दरम्यान, पुणे महानगरपालिकेकडूनही या संदर्भात संबंधित सोसायट्यांना पब्लिक नोटीस देण्याची तयारी सुरू आहे. ज्या ठिकाणी मेट्रोचे बांधकाम सुरू आहे किंवा प्रस्तावित आहे, त्या परिसरातील नागरिकांना आधीच माहिती देण्यात येणार आहे. तसेच, रस्त्यांवर माहिती फलक लावून नागरिकांना सतर्क केले जाणार आहे.

Maha Metro has woken up!” Decision to install “route markers” on underground routes..

महत्वाच्या बातम्या