विशेष प्रतिनिधी
पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विशेष कार्य अधिकारी (OSD) असल्याचे भासवून पोलीस उपायुक्तांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तोतयाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. प्रद्युम्न श्रीहरी पाटील (वय ४७, रा. हिंजवडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रद्युम्न पाटील याने पुण्यातील परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या कार्यालयात जाऊन आपली खोटी ओळख सांगितली. “मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ओएसडी आहे,” असे सांगून त्याने एका विशिष्ट गुन्ह्याचा संदर्भ दिला. “तुम्ही या गुन्ह्याचा तपास व्यवस्थित केला नाही,” असे म्हणत त्याने पोलीस उपायुक्तांवर दबाव आणण्याचा आणि त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
असा उघड झाला बनाव
पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांना संबंधित व्यक्तीच्या वागण्याबोलण्याबद्दल संशय आला. त्यांनी वेळ न घालवता तातडीने मंत्रालयातील वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून खातरजमा केली. प्रद्युम्न पाटील नावाचा कोणताही व्यक्ती उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात ओएसडी पदावर कार्यरत नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. तो केवळ तोतयागिरी करून पोलिसांवर दबाव निर्माण करत असल्याचे स्पष्ट झाले.
विश्रामबाग पोलिसांकडून अटकेची कारवाई!
बनाव उघडकीस येताच पोलिसांनी प्रद्युम्न पाटीलला ताब्यात घेतले. या प्रकरणी त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला अशा प्रकारे गुंडाळण्याचा प्रयत्न केल्याने पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. हा आरोपी अशाच प्रकारे इतर कोणाची फसवणूक करत होता का, किंवा त्याचा यामागे नेमका काय हेतू होता, याचा अधिक तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.
Pune: “I am the Deputy CM’s OSD…”; Imposter Who Threatened Deputy Commissioner of Police Arrested
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर