विशेष प्रतिनिधी
पुणे:शहरात सध्या सोशल मीडियावर, विशेषतः व्हॉट्सअॅपवर, ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या निवासी मालमत्तेवर ३० टक्के मिळकतकर सवलत दिली जात असल्याचा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र हा मेसेज पूर्णपणे खोटा असून, अशा प्रकारचा कोणताही निर्णय महापालिका किंवा राज्य शासनाने घेतलेला नाही, असा स्पष्ट खुलासा पुणे महानगरपालिकेच्या मिळकतकर विभागाने केला आहे.
महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील कोणत्याही महानगरपालिका किंवा नगरपरिषद स्तरावर ज्येष्ठ नागरिकांना सरसकट ३० टक्के मालमत्ता कर सवलत देण्याचा कोणताही शासन निर्णय सध्या अस्तित्वात नाही. तसेच या संदर्भात राज्य सरकारकडून कोणतीही योजना लागू करण्यात आलेली नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या अशा खोट्या मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, महापालिकेच्या वतीने चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी मिळकतकराची बीले तयार करण्यात आली असून त्यांचे वितरण सुरू झाले आहे. नागरिकांना दिलासा देण्यासाठी, जे करदाते ३१ मे २०२६ पर्यंत त्यांचा मिळकतकर भरतील, त्यांना सर्वसाधारण करामध्ये ५ ते १० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. मात्र ही सवलत फक्त वेळेत पूर्ण कर भरणाऱ्या नागरिकांनाच लागू होणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
मिळकतकर भरण्यासाठी नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या संकेतस्थळावरून घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने कर भरता येतो. याशिवाय बँक ऑफ महाराष्ट्र, आयसीआयसीआय बँक आणि कॉसमॉस बँक यांच्या माध्यमातूनही कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच महापालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्रे (CFC) सोमवार ते शनिवार सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत सुरू राहणार आहेत.
महापालिका प्रशासनाने स्पष्ट सांगितले आहे की, सोशल मीडियावर फिरणाऱ्या ३० टक्के सवलतीच्या दाव्याला कोणताही आधार नाही. त्यामुळे नागरिकांनी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा आणि अफवांपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
The message of ’30 percent income tax discount’ on social media is false! Pune Municipal Corporation clarifies..
महत्वाच्या बातम्या