विशेष प्रतिनिधी
पुणे : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर सहकारनगर वाहतूक विभागातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्य बजावताना गैरवर्तन आणि आर्थिक अनियमितता केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. traffic police
सहकारनगर वाहतूक विभागात कार्यरत पोलीस हवालदार अंकुश रामा पवार आणि पोलीस शिपाई लक्ष्मण बालाजी रामगडे यांना निलंबित करण्यात आले आहे. १९ एप्रिल २०२६ रोजी शारदा आर्केड चौकात वाहतूक नियंत्रणासाठी त्यांची नेमणूक करण्यात आली होती. या दरम्यान सिग्नल तोडणाऱ्या दुचाकी वाहनांवर कारवाई करताना संबंधित पोलिसांकडून नियमबाह्य पद्धतीने रोख रक्कम स्वीकारल्याचा आरोप आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित वाहनचालकांकडून एकूण ५०० रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, या कारवाईदरम्यान अधिकृत ‘ई-चलन’ नोंदविण्यात आले नव्हते. ही बाब एका व्यक्तीने मोबाईलवर चित्रित केली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
या घटनेनंतर चौकशी करून संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत प्राथमिक व विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त (वाहतूक) हिम्मत जाधव यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. निलंबन काळात संबंधित कर्मचाऱ्यांना नियमांनुसार निर्वाह भत्ता देण्यात येणार असून, त्यांना दररोज पोलीस मुख्यालयात हजेरी लावणे बंधनकारक असणार आहे.
Two traffic police officers suspended after video of taking money goes viral on social media
महत्वाच्या बातम्या