विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी दौंड तालुक्यातील खडकी जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले विरधवल ऊर्फ बाबा जगदाळे यांची तर, उपाध्यक्षपदासाठी आंबेगाव तालुक्यातील पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे सदस्य विवेक वळसे पाटील यांची नावे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत असल्याने या दोन्ही पदांसाठी अनुक्रमे जगदाळे आणि वळसे पाटील यांच्या निवडीची केवळ औपचारिक घोषणा बाकी राहिली आहे. अधिकृत घोषणा बुधवारी दुपारी तीन वाजता केली जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचे सर्वाधिकार पक्षाच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दिले होते. यानुसार सुनेत्रा पवार यांनी या दोघांची नावे बंद पाकिटातून पाठविली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांची बुधवारी सकाळी १० वाजता पुणे येथील पक्षाच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत हे बंद पाकिट उघडण्यात आले.
मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या पुर्वसंध्येला पुणे जिल्हा परिषदेचे नवे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडले जाणार आहेत. या निवडीमुळे गेल्या मागील सुमारे ४ वर्षांपासून असलेली अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची प्रतिक्षा आता संपणार आहे. शिवाय प्रदीर्घ काळापासून जिल्हा परिषदेवर सुरू असलेलले प्रशासकराज संपुष्टात येणार आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेची पहिली विशेष सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.१८ मार्च) होणार आहे. या सभेतच साध्या बहुमताच्या आधारे जिल्हा परिषदेचे नवे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडले जाणार आहेत. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठीची प्रक्रिया ही बुधवारी सकाळी ११ वाजता सुरू होईल. यानुसार त्याच दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत इच्छुकांना या दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठीची विशेष सर्वसाधारण सभा सुरू होणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल
राष्ट्रवादी काँग्रेस — ५१
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष — ०१
भाजप — १०
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) — ०६
शिवसेना — ०५
एकूण — ७३
साध्या बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ — ३७
Viradhwal Jagdale for Pune ZP President, Vivek Walse Patil Vice President
महत्वाच्या बातम्या
- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
- भाजपचे मिशन तमिळनाडू, सुपरस्टार विजय यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!
- Ambadas Danve ठोकून काढू, कापून टाकू’ म्हणत अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी
- कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ, मुख्यमंत्र्यांचा विश्वास