विशेष प्रतिनिधी
नाशिक : Girish Mahajan कुंभमेळा केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक व शाश्वत विकासाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक संधी आहे. यामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याचे वेळेत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने आयोजन करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासनाला दिले आहेत.Girish Mahajan
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत मंत्री महाजन यांनी विविध विभागांची तयारी तपासली. यावेळी आमदार देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, पोलीस महासंचालक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी असीमा मित्तल आदी उपस्थित होते.
मंत्री महाजन यांनी प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्याचा संदर्भ देत सांगितले की, “त्या मेळ्यात मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती होती, तसेच नाशिक-त्र्यंबकेश्वर येथेही यंदा तितकीच किंवा अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा आणि भाविकांसाठीच्या सेवा वेळेआधी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.”
त्यानंतर त्यांनी नाशिक महापालिका, त्र्यंबकेश्वर नगरपरिषद, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांच्या तयारीचा आढावा घेतला. गोंधळ टाळण्यासाठी विभागांमध्ये समन्वय साधावा, कचरा व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्त्यांचे मजबुतीकरण, वाहतुकीसाठी नियोजन याकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
डॉ. गेडाम आणि जिल्हाधिकारी शर्मा यांनी आतापर्यंत झालेल्या कामांची माहिती सादर केली. अनेक विकासकामे प्रगतिपथावर असून त्यासाठी निधीचे वितरणही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. महाजन यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले की, “गुंतवणूक व भाविकांचा अनुभव लक्षात घेता, कुंभमेळा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून नाशिकच्या जागतिक ओळखीचा एक भाग आहे. त्यामुळे कुठलीही ढिलाई सहन केली जाणार नाही.”
महाजन यांनी सर्व यंत्रणांना सिंगल युज प्लास्टिकचा वापर थांबवण्याच्या सूचना दिल्या. कुंभ क्षेत्रात जैवविविधता आणि गंगा-गोदावरीच्या प्रदूषणापासून संरक्षण यावर भर दिला जाणार आहे. शौचालये, वॉटर फिल्टरिंग यंत्रणा, जैव विघटनक्षम कचरा प्रक्रिया केंद्रे उभारण्यावर भर देण्यात येईल.
डिजिटल पद्धतीने माहिती देणारे पोर्टल, मोबाइल अॅप्स, GPS आधारित वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षा यंत्रणा उभारण्यावरही चर्चा झाली. दरम्यान, वाहतूक आणि गर्दी नियंत्रणासाठी ड्रोन आणि नियंत्रण कक्षाची निर्मिती होणार असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले.
Minister Girish Mahajan orders that preparations for Kumbh Mela should be timely and environmentally friendly
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती