विशेष प्रतिनिधी
पुणे : गेल्या १५ वर्षांपासून पोलिसांच्या रडारवर असलेला आणि भूमिगत झालेला कट्टर नक्षलवादी प्रशांत कांबळे उर्फ ‘लॅपटॉप’ याला पुण्यात अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) ही कारवाई केली.
प्रशांत कांबळे हा ताडीवाल रोडवरील झोपडपट्टी भागात राहत होता. संगणक आणि लॅपटॉप दुरुस्तीचे काम करणाऱ्या प्रशांतने १५ नोव्हेंबर २०१० रोजी ‘मुंबईला कामासाठी जातो’ असं सांगून घर सोडलं होतं आणि त्यानंतर तो परत आलाच नाही. त्याच्या कुटुंबीयांनी १८ जानेवारी २०११ रोजी बंडगार्डन पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
तपासात उघड झालं की, प्रशांत कांबळे काही काळ कबीर कला मंचच्या संपर्कात होता. या संस्थेचे काही कार्यकर्ते आणि संशयित माओवादी अँजेलो सोनटक्के हिला २०११ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर प्रतिबंधित संघटना भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी)चे सक्रिय सदस्य असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
प्रशांत कांबळे आणि संतोष शेलार हे दोघे पुण्यातून बेपत्ता झाल्यानंतर गडचिरोलीच्या जंगलात माओवादी गटात सामील झाल्याचे समोर आले. तपासात असेही निष्पन्न झाले की, हे दोघे माओवादी नेते मिलिंद तेलतुंबडे यांच्यासोबत काम करत होते. तेलतुंबडे नोव्हेंबर २०२१ मध्ये गडचिरोलीमध्ये झालेल्या चकमकीत ठार झाला होता.
दरम्यान, संतोष शेलार याला जानेवारी २०२४ मध्ये आजारी अवस्थेत पुण्यात आल्यानंतर अटक करण्यात आली होती. आता प्रशांत कांबळे यालाही अटक झाल्याने पुण्यातील शहरी नक्षलवादाच्या हालचालींवर मोठा आघात झाला आहे.
या अटकेनंतर एटीएस अधिक तपास करत असून, प्रशांतने गेल्या १५ वर्षांत कोणकोणत्या गुप्त कारवाया केल्या, याचा शोध घेतला जात आहे.
Hardline Naxalite ‘laptop’ found in Pune; He was absconding for 15 years
महत्वाच्या बातम्या
- Pakistan पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची मोठी कारवाई; पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर बंदी
- Neelam Gorhe : पालघरमध्ये उपचाराअभावी मातेसह नवजात बालकाचा मृत्यू, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आरोग्य संचालकांना चौकशीचे निर्देश
- Sonu Nigam : सोनू निगमवर गुन्हा दाखल, कन्नडमध्ये गाणे गायचा आग्रह अन् म्हणाला यामुळेच पहलगाममध्ये युद्ध झालं…
- Ajit Pawar : तर अजित पवार, एकनाथ शिंदे हाेऊ शकतात मुख्यमंत्री… संजय राऊत यांचा दावा