विशेष प्रतिनिधी
पाटणा: Tej Pratap राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी मोठ्या मुलगा तेज प्रताप यादव यांना पक्षातून आणि कुटुंबातून हकालपट्टी केल्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर तेज प्रताप यांचे अनुष्का यादव नावाच्या महिलेसोबतचे खासगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणामुळे यादव कुटुंब आणि पक्षात मोठा वाद निर्माण झाला असून, राजकीय वर्तुळातही याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.Tej Pratap
लालू प्रसाद यादव यांनी ‘X’ वर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “वैयक्तिक जीवनातील नैतिक मूल्यांचा भंग सामाजिक न्यायासाठीच्या आमच्या लढाईला कमकुवत करतो. तेज प्रताप यांचे वर्तन आणि सार्वजनिक आचरण कुटुंबीय तसेच पक्षाच्या मूल्यांशी सुसंगत नाही. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय जनता दलातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात येत असून, कुटुंबातून कायमस्वरूपी बाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे.लालू यांनी याप्रकरणी कोणतीही तडजोड न करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
लालू यांच्या निर्णयाला त्यांचे धाकटे पुत्र आणि आरजेडीचे प्रमुख नेते तेजस्वी यादव यांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. तेजस्वी म्हणाले, “वैयक्तिक जीवन आणि राजकीय जबाबदारी यांचा समतोल राखणे गरजेचे आहे. माझ्या भावाने घेतलेले वैयक्तिक निर्णय त्याच्या स्वतःच्या बाबतीत असू शकतात, परंतु राजकीय जीवनात असे वर्तन अस्वीकार्य आहे. आम्ही बिहारच्या जनतेच्या हितासाठी काम करतो आणि पक्षप्रमुखांचा निर्णय आमच्यासाठी अंतिम आहे.
लालू यांची कन्या रोहिणी आचार्य यांनीही X वर अप्रत्यक्षपणे तेज प्रताप यांच्यावर टीका करत वडिलांच्या निर्णयाचे समर्थन केले. त्या म्हणाल्या, “कुटुंब, परंपरा आणि प्रतिष्ठा जपणाऱ्यांवर कधी प्रश्नचिन्ह उभे राहत नाही. मात्र, वारंवार मर्यादा ओलांडणाऱ्यांना टीकेला सामोरे जावे लागते. आमच्यासाठी वडील हे देवासमान आहेत, कुटुंब हे मंदिर आहे आणि सामाजिक न्याय ही आमची पूजा आहे. या मूल्यांना कोणीही गालबोट लावू शकत नाही.”
हा वाद 24 मे 2025 रोजी तेज प्रताप यांनी फेसबुकवर अनुष्का यादव यांच्या सोबतचा एक फोटो आणि त्यांच्या 12 वर्षांच्या प्रेमसंबंधांचा खुलासा करणारी पोस्ट शेअर केल्याने सुरू झाला. या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ माजली. काही तासांतच तेज प्रताप यांनी ही पोस्ट डिलीट करत दावा केला की, “माझे फेसबुक अकाउंट हॅक झाले होते आणि तो फोटो एआय-निर्मित होता. मात्र, तोपर्यंत अनुष्का यांच्यासोबतचे करवा चौथ साजरे करतानाचे फोटो, तिचे साडी व कुंकू लावलेले छायाचित्र आणि एका कथित विवाह समारंभाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
या प्रकरणावर राजकीय विरोधकांनीही तीव्र टीका केली आहे. बिहारमधील भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी X वर लिहिले आहे की लालूप्रसाद यादव यांनी आपल्या मुलाला पक्षातून बाहेर काढले हा त्यांचा कौटुंबिक आणि पक्षांतर्गत निर्णय आहे. पण यातून आरजेडीची अंतर्गत अस्थिरता आणि मूल्यांचा अभाव दिसून येतो. बिहारच्या जनतेला अशा राजकारणाची गरज नाही.
जेडीयू नेते नितीन नवीन यांनीही टिप्पणी केली की, “यादव कुटुंबाची ही अंतर्गत लढाई बिहारच्या राजकारणावर परिणाम करेल. जनता आता प्रामाणिक नेतृत्वाची अपेक्षा करते.
तेज प्रताप यांनी या प्रकरणावर X वर एका अस्पष्ट पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “सत्य कधीच लपत नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्याला लक्ष्य करून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी लवकरच सर्व सत्य जनतेसमोर आणेन.” मात्र, त्यांनी अनुष्का यादव यांच्यासोबतच्या संबंधांबाबत कोणतेही स्पष्ट विधान केलेले नाही.
यापूर्वी तेज प्रताप यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. त्यांचा 2018 मध्ये ऐश्वर्या राय यांच्याशी झालेला विवाह आणि त्यानंतरचा घटस्फोट यामुळेही ते चर्चेत होते.
पक्षातील काही नेत्यांनी खासगीत सांगितले की, तेज प्रताप यांचे वर्तन गेल्या काही वर्षांपासून पक्षाच्या प्रतिमेसाठी अडचणीचे ठरत आहे. दुसरीकडे, लालू यांचा हा निर्णय पक्षातील एकजुटीवर परिणाम करू शकतो, अशी भीतीही काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. बिहारमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद पक्षासाठी राजकीयदृष्ट्या नुकसानकारक ठरू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
Lalu Prasad Yadav expelled his eldest son from the party, Tej Pratap’s viral photo with Anushka became the reason
महत्वाच्या बातम्या
- Harshvardhan Sapkal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका
- Sophia Qureshi : बेजबाबदार पाकिस्तान, भारतावर हल्ला करत असतानाही सुरू ठेवली नागरी विमानसेवा, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती
- Rashtriya Swayamsevak Sangh : देशविरोधी षड्यंत्रांना यश मिळू देऊ नका! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशवासीयांना आवाहन
- IPL 2025 Postponed : भारत-पाकिस्तान तणावाचा आयपीएलला फटका, स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित