विशेष प्रतिनिधी
दिल्ली : कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे माजी खासदार ब्रिज भूषण शरण सिंग यांच्यावर एका अल्पवयीन कुस्तीपटूने केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांची केस आता दिल्लीतील न्यायालयाने अधिकृतरित्या बंद केली आहे. पटियाला हाऊस कोर्टाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश गोमती मनोचा यांनी दिल्लीतून दाखल करण्यात आलेला पोलीसांचा क्लोझर रिपोर्ट (case closure report) मान्य केला आहे. त्यामुळे ही केस न्यायालयाच्या संकेतस्थळावर औपचारिकपणे “बंद” म्हणून नोंदवली गेली आहे.
या प्रकरणात अल्पवयीन मुलीने सिंग यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. मात्र, नंतर तिने तिचे आरोप मागे घेतले. कोर्टात मुलगी आणि तिचे वडील स्वतः उपस्थित राहिले होते. त्यांनी पोलीस तपासावर समाधान व्यक्त केले आणि केस बंद करण्यास कोणताही आक्षेप नसल्याचे स्पष्ट केले.
दिल्ली पोलिसांनी सादर केलेल्या क्लोझर रिपोर्टमध्ये पीडित मुलीच्या आरोप मागे घेण्याचा आणि कोणताही आक्षेप नसल्याचा उल्लेख करत, केस बंद करण्याची शिफारस केली होती.
याच प्रकरणात ब्रिज भूषण सिंग यांच्या विरोधात देशभरात मोठ्या प्रमाणावर आंदोलने झाली होती. भारतातील अनेक आघाडीचे कुस्तीपटू रस्त्यावर उतरले होते आणि न्याय मिळेपर्यंत लढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता. मात्र, अल्पवयीन पीडितेने आपली तक्रार मागे घेतल्याने आणि तपासात कोणतीही ठोस दखल घेण्यासारखी बाब आढळून न आल्याने, आता या प्रकरणावर कोर्टाने पूर्णविराम दिला आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंनी जंतर-मंतर येथे आंदोलन केले होते. सात महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
विनेश फोगटसारख्या दिग्गज कुस्तीपटूंच्या नेतृत्वाखाली जानेवारीत कुस्तीपटूनी आंदोलन केले होते. तेव्हा लखनौ येथील राष्ट्रीय शिबिरात महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण होत असल्याचा दावा यावेळी करण्यात आला होता. संपूर्ण पुराव्यासहित हा दावा कुस्तीपटूंकडून करण्यात आला होता. परंतु केंद्रीय क्रिडा मंत्री अनुराग ठाकुर यांच्यासोबत चर्चा करून तेव्हा आंदोलन मागे घेण्यात आलं होतं.