विशेष प्रतिनिधी
मुंबई : Anjali Damania याचिकाकर्त्यांची चुकीची मांडणी, सरकारी वकिलांचा घोळ यामुळे धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळाली. महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की, पहिले धनंजय मुंडे नंतर माणिकराव कोकाटे असे कृषीमंत्री झाले. धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये घेऊ नये, अशी विनंती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.Anjali Damania
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी मंत्रीपद असताना कृषी विभागात 200 कोटींचा घोटाळा झाला आहे असा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे हे कृषीमंत्री असताना सुमारे 245 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पत्रकार परिषद घेऊन केला होता. मात्र, या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय मुंडेंना निर्दोष म्हटले आहे.Anjali Damania
धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेती पूरक साहित्य खरेदीसाठी राबवलेल्या विशेष कृती आराखड्यांतर्गत कृषी साहित्याच्या थेट खरेदी व वितरणाच्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध करणाऱ्या दोन्ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. यावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या की, परवा संध्याकाळी उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे. मला यामध्ये काही त्रुटी वाटत आहेत त्या मी मांडणार आहे. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही घेऊन जाणार आहोत. शासनाकडचे जे वकील होते त्यांनी अतिशय शातीरपणे सगळं मांडलं. जे दोन जीआर होते, ते वेगवेगळ्या विभागाचे आहेत, असं त्यांनी मांडलं. वकिलांनी जे सगळं मांडलं ते चुकीचं आहे. या प्रकरणांमध्ये भ्रष्टाचाराचा कुठेही उच्चार देखील करण्यात आला नाही.
भ्रष्टाचाराचा अँगल कुठेही मांडला गेला नाही. यामुळे धनंजय मुंडेंना अजून कोणत्याही प्रकारची क्लीन चीट मिळालेली नाही. या संपूर्ण प्रकरणाला चॅलेंज करायची गरज आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये हा विषय मांडण्याची गरज आहे. माझा लढा लोक आयुक्तांसमोर चालू आहे. सत्यमेव जयते हे धनंजय मुंडे यांना शोभत नाही. व्ही. राधा ज्या सचिव होत्या, त्यांचा अहवाल कधीही मांडण्यात आला नाही. त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. आठ वेळा सचिवाने सांगितलं की, हे सर्व चुकीचं होतं आहे असा आरोप दमानिया यांनी केला.