विशेष प्रतिनिधी
माले (मालदीव) : भारत आणि मालदीवमधील द्विपक्षीय सहकार्याचा एक नवा अध्याय रचत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवच्या ६० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित औपचारिक भेटीदरम्यान मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईझू यांना दोन अत्याधुनिक ‘भीष्म क्यूब्स’ भेट दिले. या आरोग्य क्यूब्सच्या माध्यमातून भारताने पुन्हा एकदा आरोग्य सहकार्य आणि मैत्रीचे बंध दृढ केले आहेत. Bhishma Cubes
पंतप्रधान मोदींनी भेटीच्या वेळी म्हटले, “भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग, हित आणि मैत्री (BHISHM) हे केवळ तांत्रिक नवकल्पना नाही, तर ही भारताची वेळेवर आणि करुणामय आरोग्यसेवेच्या वचनबद्धतेची प्रतीक आहे.”
‘भीष्म क्यूब’ हा भारताच्या ‘आरोग्य मैत्री’ उपक्रमाचा भाग असून, २०२४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्ती आणि संकटग्रस्त देशांना आपत्कालीन आरोग्य सेवा पुरविण्यासाठी भारत सहकार्य करतो.
या क्यूब्स राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या ( NDMA) मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आल्या असून त्या जलद तैनातीसाठी खास डिझाइन केल्या आहेत. एका पूर्ण ‘भीष्म क्यूब’मध्ये ३६ मिनी क्यूब्सचा समावेश असतो, जे २०० रुग्णांवर त्वरित उपचार करण्यास सक्षम असतात. क्यूबमध्ये आवश्यक औषधे, शस्त्रक्रियेचे उपकरण, ट्रॉमा केअर किट्स, AI-सह प्रणाली समाविष्ट असते. या युनिट्स केवळ १२ मिनिटांत तैनात करता येतात, जे आपत्कालीन परिस्थितीतील ‘गोल्डन अवर’मध्ये अमूल्य ठरते. ७२ घटकांपासून बनलेल्या या क्यूब्सना हाताने, सायकलवरून किंवा ड्रोनद्वारेही पोचवता येते. RFID-आधारित स्टॉक व्यवस्थापन प्रणालीमुळे औषधांचा मागोवा ठेवता येतो. १८० भाषांमध्ये डिजिटल सहाय्य उपलब्ध असून, प्रत्येक युनिटसोबत टॅबलेट दिले जाते. हे क्यूब्स जलरोधक, हलके व हवामान सहनशील आहेत.
मालदीव हे ११९२ प्रवाळ बेटांचे राष्ट्र असून, त्यांच्या दरम्यान कोणतीही भूमी मार्गे जोडणी नाही. त्यामुळे आरोग्यसेवा पोहोचवणे हे मोठे आव्हान आहे. अशा वेळी भारताकडून देण्यात आलेले हे भीष्म क्यूब्स मालदीवच्या आपत्ती व्यवस्थापन व आरोग्य क्षमतेत महत्त्वपूर्ण वाढ करतील.
या भेटीद्वारे भारताने पुन्हा एकदा संकटकाळी मदतीस तत्पर असलेली मित्रराष्ट्र म्हणून आपली भूमिका अधोरेखित केली आहे. भारताच्या “नेबरहुड फर्स्ट” धोरणाचा हा एक ठोस प्रत्यय मालदीवसारख्या समुद्रकिनारी राष्ट्राला आरोग्यदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.