विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठी विरुद्ध हिंदी हा वाद सुरू असताना आता पुन्हा एकदा जुना वाद नव्याने उफाळून आला आहे. गेल्या आठवड्यात झळकलेला मराठी ‘येरे येरे पैसा 3’ या चित्रपटाला स्क्रीन न दिल्याने निर्माते अमेय खोपकर तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. आता काचा फुटणार असा इशारा मनसेचे नेते आणि चित्रपट निर्माते अमेय खोपकर यांनी दिला आहे. Amey Khopkar
पहिल्या आठवड्यात चांगला चाललेल्या या चित्रपटाला दुसऱ्या आठवड्यात स्क्रीन न दिल्यामुळे मराठीजनांमध्ये नाराजी पसरली आहे. मात्र, याबाबत सोमवारी मराठी चित्रपट निर्माते, पोलीस, मल्टिप्लेक्सचे मालक यांची बैठक मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी बोलावली आहे. Amey Khopkar
मी माझ्या चित्रपटासाठी आंदोलन करणार नाही पण आता काचा फुटणार, असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला आहे. येरे येरे पैसा याचे आधीचे दोन चित्रपट चांगलेच लोकप्रिय झाले होते. त्यामुळे हा सिक्वल काढण्यात आला. यालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत होता. मात्र, दुसऱ्याच आठवड्यात मल्टिप्लेक्स मालकांनी ‘येरे येरे पैसा 3’ चित्रपटाला खाली उतरवले. याबद्दल प्रचंड नाराजी पसरली आहे. मराठी चित्रपटांबाबत असे अनेकदा घडते आणि याबद्दल मनसेने अनेकदा आंदोलने केली आहेत.
याबाबत संजय राऊत यांनी ट्विट करत मराठीसाठी सगळे एकत्र येत आहेत, लढत आहेत तरीही प्रश्न काही संपत नाहीत, अशी टिपण्णी केली आहे. तसेच संयारा या हिंदी चित्रपटाला थिएटर मिळावे म्हणून येरे येरे पैसा 3 हा मराठी चित्रपट उतरवला आहे. हे नेहमीचेच झाले असून मराठीचा लढा अधिक तीव्र करावा लागेल, असे सांगतानाच मराठीचे खरे मारेकरी वेगळेच आहेत, याकडे लक्ष वेधले आहे. तर दुसऱ्या आठवड्यात येरे येरे पैसा 3 थिएटर मिळावा नाही. तर मराठी चित्रपटाला थिएटर मिळत नाही, त्यासाठी आंदोलन करावे लागते आणि ज्यांच्यासाठी उभे राहिलो, अंगावर केसेस घेतल्या त्या मनोरंजन क्षेत्रातील एकही कलाकार पुढे आलेला नाही, याचं वाईट वाटतं, अशी उद्विग्न प्रतिक्रिया अमेय खोपकर यांनी दिली.
याची गंभीर दखल मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतली आहे. त्यांनी सोमवारी (28 जुलै) सर्व मराठी चित्रपट निर्माते, मॉल-मल्टिप्लेक्सचे मालक आणि पोलिसांची बैठक घेणार असल्याचे सांगितले आहे. तसेच चांगल्या चालत असलेल्या सिनेमाला स्क्रीन उपलब्ध करणे ही निर्मात्यांची मेहेरबानी नाही, अशीही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, तक्रार आली तर सरकार मदत करेल, असे मंत्री नितेश राणे म्हणाले आहेत. त्यामुळे मल्टिप्लेक्स न मिळाल्यास माध्यमांकडे धाव घेण्यासाठी आम्हाला कळवा, असा टोलाही त्यांनी अमेय खोपकर यांना लगावला आहे.