विशेष प्रतिनिधी
मुंबई : अंमलबजावणी संचलनालय (ईडी) मुंबई विभागीय कार्यालयानं राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या विरोधात आणखी एक पाऊल टाकलं आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करत त्यामध्ये तीन नावं वाढवण्यात आली आहेत. आमदार रोहित पवार, मेसर्स बारामती अॅग्रो लिमिटेड आणि राजेंद्र इंगवले यांची नावं कथित मनी लाँड्रिंगच्या आरोपावरुन 9 जुलै 2025 ला वाढवण्यात आली आहे, अशी माहिती ईडीकडून देण्यात आली आहे. Rohit Pawar
रोहित पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महायुती सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं आहे.ईडीनं आज सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणात विशेष पीएमएलए कोर्ट मुंबई यांच्याकडून 18 जुलैला प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती ईडीकीडून दिली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणात ईडीकडून दाखल करण्यात आलेली तिसरी पुरवणी आरोपपत्र दाखल केल्याची माहिती दिली आहे.
रोहित पवार, बारामती अॅग्रो लिमिटेड आणि राजेंद्र इंगवले यांच्या विरोधात यापूर्वीच ईडीनं पुरवणी आरोपपत्र दाखलं केलं आहे. मात्र, आज ईडीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन पोस्ट करण्यात आली आहे.
कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या खरेदीवरुन ईडीनं महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात तिसरं पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणाचा ईडीकडून तपास केला जात आहे. कन्नड सहकारी साखर कारखान्याची कथित बनावट लिलाव प्रक्रियेतून खरेदी केल्याचा ईडीला संशय आहे. 2009 मध्ये, एमएससीबीने कन्नड एसएसकेकडून 80.56 कोटी रुपयांच्या थकबाकीची वसुली करण्यासाठी कारखान्याच्या मालमत्तेचा ताबा घेतला होता.
त्यानंतर संशयास्पद मूल्यांकनाच्या आधारे बँकेने अत्यंत कमी राखीव किमतीत लिलाव प्रक्रिया राबवली. ईडीचा आरोप आहे की ही लिलाव प्रक्रिया अनेक गंभीर अनियमिततेने भरलेली होती. सर्वाधिक बोली लावणाऱ्या प्रतिस्पर्ध्याला दुर्बल आणि विवादित कारणे देऊन अपात्र ठरवण्यात आले, तर बारामती अॅग्रोशी संबंधित व्यक्ती, ज्यांची आर्थिक पात्रता व अनुभव संशयास्पद होता, त्यांना लिलावात सहभागी ठेवण्यात आले.