विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यानंतर ते कर्ज फेडत नाहीत. त्यामुळे बँका बुडतात. मी पुढेमागे कधी मुख्यमंत्री झालो, तर प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना सध्याच्या अनुदानाच्या दुप्पट रक्कम देईन, असे विधान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केले आहे.
कागल तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले, लाडकी बहीण योजनेमुळे सध्या राज्य सरकारसमोर आर्थिक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. लाडक्या बहिणींसाठी सुमारे 46 हजार कोटींचा खर्च करावा लागत आहे. काही पुरुषांनीही या योजनेचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी लांबणीवर जात आ.
कर्जमाफीबाबत माझे मत वेगळे आहे असे सांगताना मुश्रीफ म्हणाले, कर्जमाफी करणार म्हटले की, शेतकरी कर्ज भरत नाहीत. वारंवार कर्जमाफी जाहीर केल्यास शेतकरी कर्ज फेडण्यास टाळाटाळ करतात. परिणामी सहकारी बँका व पतसंस्था अडचणीत येतात. बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे सहकारी पतसंस्थांचे तब्बल 38 हजार कोटी रुपये थकीत आहेत.
प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना आपण दुप्पट पैसे दिले पाहिजेत. म्हणजे शेतकऱ्यांना पैसे भरायची सवय लागेल. नाहीतर नुसती कर्जमाफी करत राहिले तर थकबाकीमुळे बँका बुडून जातील. पुढेमागे तुम्ही कधी मला या राज्याचा मुख्यमंत्री केले तर मी प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दुप्पट अनुदान देईन, असेही हसन मुश्रीफ म्हणाले.
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कौतुक करताना मुश्रीफ म्हणाले, गेल्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात कृषी कर्जाची वसुली 90 टक्क्यांवर पोहोचली होती. यंदा ती 91 टक्क्यांवर गेली आहे. कोल्हापूरचा शेतकरी मेहनती आहे, त्याला फुकट काही नको. त्याच्या उसाची पैसे सोसायटीमार्फत मिळतात आणि त्यामुळे कर्जाची परतफेड वेळेवर होते. तो हक्क मागतो, भीक नाही.