विशेष प्रतिनिधी
वडोदरा :“युद्ध केवळ बंदुका आणि गोळ्यांनी जिंकले जात नाहीत, तर त्या वेळेत पोहोचवल्या जातात का, हे अधिक महत्त्वाचे ठरते. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे उत्कृष्ट लॉजिस्टिक्स व्यवस्थापनाचे जिवंत उदाहरण आहे,” असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज केले. Rajnath Singh
वडोदऱ्यातील ‘गती शक्ती विश्वविद्यापीठा’च्या (GSV) पदवी प्रदान समारंभात व्हर्चुअल माध्यमातून संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले की, “सैन्य दलांची हालचाल असो की आवश्यक वेळेत योग्य ठिकाणी पोहोचवणे यामध्ये आमच्या संस्थांनी केलेल्या निर्बंधविरहित लॉजिस्टिक्स व्यवस्थापनाने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं. लॉजिस्टिक्सकडे केवळ वस्तू पोहोचवण्याच्या प्रक्रियेपेक्षा एक रणनीतिक दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. सीमेवर लढणारे जवान असोत की आपत्ती व्यवस्थापनातील कर्मचारी जर योग्य समन्वय आणि संसाधनांचे व्यवस्थापन नसेल, तर कितीही प्रबळ इच्छाशक्ती असली, तरी ती निष्फळ ठरते. लॉजिस्टिक्स ही ती शक्ती आहे जी अराजकतेला नियंत्रणात रूपांतरित करते,” असे ते म्हणाले.
राजनाथ सिंह यांनी लॉजिस्टिक्स क्षेत्राचा देशाच्या आर्थिक प्रगतीत महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे नमूद करताना सांगितले की, “पूर्व-उत्पादनापासून ते ग्राहकांपर्यंत प्रत्येक टप्पा एकमेकांशी लॉजिस्टिक्सद्वारे जोडलेला आहे. कोविड काळात देशभरात लसी, ऑक्सिजन सिलिंडर आणि वैद्यकीय पथक पोहोचवण्यात या व्यवस्थेची भूमिका निर्णायक ठरली. गेल्या ११ वर्षांमध्ये भारतात अभूतपूर्व पायाभूत सुविधा विकास झाला असून, हे परिवर्तन धोरणात्मक सुधारणा आणि मिशन मोड प्रकल्पांच्या माध्यमातून साधले गेले आहे. त्याचा परिणाम केवळ भौतिक जोडणीपुरता मर्यादित न राहता, आर्थिक उत्पादकता वाढवण्यास, लॉजिस्टिक्स खर्च कमी करण्यास आणि सेवा वितरण सुधारण्यास झाला आहे.
पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनच्या माध्यमातून रेल्वे, रस्ते, बंदरे, जलमार्ग, विमानतळ, सार्वजनिक वाहतूक आणि लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधा या सात क्षेत्रांच्या एकत्रित विकासाला बळ मिळाले आहे. “PM गतिशक्ती ही योजना नसून एक दृष्टी आहे – जी आधुनिक तंत्रज्ञान आणि डेटा-आधारित नियोजनाद्वारे पायाभूत सुविधा भविष्यानुकूल बनवत आहे,” असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
राष्ट्रीय लॉजिस्टिक्स धोरणाविषयी बोलताना ते म्हणाले की, या धोरणाचा उद्देश एकात्मिक, कार्यक्षम आणि किफायतशीर लॉजिस्टिक्स नेटवर्क तयार करणे हा आहे. सध्या असलेला १३-१४% लॉजिस्टिक्स खर्च कमी करून तो विकसित देशांच्या पातळीवर आणण्याचे उद्दिष्ट या धोरणाचे आहे. यामुळे भारतीय उत्पादनांच्या स्पर्धात्मकतेत देशांतर्गत व जागतिक बाजारपेठेत वाढ होईल. लॉजिस्टिक्स खर्च कमी झाल्यास सर्व क्षेत्रात कार्यक्षमता वाढेल आणि मूल्यवर्धनास चालना मिळेल.
गती शक्ती विद्यापीठाबद्दल बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, “गतीशक्तीच्या माध्यमातून देशाला जी ‘गती’ तरुणाई देत आहे, ती निश्चितच उल्लेखनीय आहे. GSV हे केवळ शैक्षणिक संस्थान नाही, तर एक कल्पना आहे, एक मिशन आहे जे भारताला गतिमान, संघटित आणि समन्वित मार्गाने पुढे नेण्याच्या राष्ट्रीय इच्छेला मूर्त रूप देत आहे.