विशेष प्रतिनिधी
जॉर्जिया : महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात, दिव्या देशमुखने ग्रँडमास्टर आणि देशबांधव कोनेरू हम्पीचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे. यासह ती FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. Divya Deshmukh
मराठमोळी दिव्या देशमुख यासह भारताची 88 वी ग्रँडमास्टर बनली . टायब्रेकमध्ये गेलेल्या फायनलमध्ये, दिव्याने हम्पीला १.५-०.५ असे हरवले. पहिला रॅपिड गेम बरोबरीत सुटला होता. त्यानंतर पुढच्या गेममध्ये दिव्याने काळ्या मोहऱ्यांसह झकास खेळ केला आणि बाजी मारली. महिला बुद्धिबळ विश्वचषकामधील दुसऱ्याच प्रयत्नात दिव्याने भारतीय विक्रम नोंदवला आहे. १९ वर्षांची ही विश्व कनिष्ठ विजेती खेळाडू गेल्या ३४ वर्षांत महिला कॅन्डिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरणारी पहिली किशोरवयीन खेळाडू ठरली आहे.
https://twitter.com/FIDE_chess/status/1949782959747223986
या सामन्याचे दोन राऊंड झाले. यातील दुसऱ्या राऊंडमध्ये दिव्याने ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीवर विजय मिळविला. दिव्या देशमुख ही अतिशय शांत आणि संयमी खेळाडू आहे. तिच्या चाली आक्रमक असून, तिने खेळलेली चाल भल्याभल्या दिग्गज खेळाडूंना मात देण्यासाठी पुरेशी ठरली आहे.
दिव्या देशमुखने आतापर्यंत जगभरातील विविध स्पर्धांमध्ये २५ सुवर्ण, ६ रौप्य आणि ४ कास्य पदके जिंकली आहेत. बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये तिच्या नावावर सुवर्ण आणि कांस्यपदक आहे. ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियन आणि तीन वेळा आशियाई विजेती असलेल्या दिव्याने आंतरराष्ट्रीय मास्टर नॉर्मससह बुद्धिबळातील सर्वाधिक प्रतिष्ठेचा महिला ग्रॅण्डमास्टर किताब सुद्धा पटकावला आहे. बुद्धिबळातील या अद्वितीय कामगिरी आणि योगदानाबद्दल राज्य सरकारने दिव्याला दोन वर्षांपूर्वी शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने (Award) सन्मानित केले आहे.