विशेष प्रतिनिधी
पुणे :खराडीतील उच्चभ्रू वसाहतीतील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर झळकले. त्यामुळे ही दृश्ये पोलिसांकडून लीक झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, ही संपूर्ण कारवाई पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने करण्यात आली असून, कुठलाही व्हिडिओ किंवा फोटो पोलिसांकडून लीक करण्यात आलेला नाही, असे स्पष्ट प्रतिपादन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.
पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले की, पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची दृश्ये प्रसारमाध्यमांना देण्यात आलेली नाहीत. जी कारवाई करण्यात आली, त्याची अधिकृत माहिती आम्ही दिली आहे. त्यात अटक केलेल्या व्यक्तींची नावे, जप्त केलेल्या अंमली पदार्थांची माहिती आणि गुन्ह्याचे स्वरूप समाविष्ट आहे. त्याशिवाय काहीही प्रसिद्ध केलेले नाही.”
काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असले तरी, त्याला पोलीस जबाबदार नसल्याचे त्यांनी सांगितले. “लोक स्वतःचे मोबाईल वापरून फोटो किंवा व्हिडिओ काढत असतील, तर त्यावर आम्ही बंधन घालू शकत नाही. मात्र, पोलिसांकडून अधिकृतपणे काहीही लीक झालेले नाही,” असे ते म्हणाले.
या कारवाईबाबत कुणीही मनात शंका बाळगू नये, असे आवाहन करत त्यांनी सांगितले की, “ही कारवाई पूर्णपणे इन्फॉर्मेशन-बेस्ड होती. आम्हाला विशिष्ट गुप्त माहिती मिळाली होती, त्याअनुषंगाने नियमानुसार कारवाई केली. संबंधित व्यक्ती कोण आहे याचा विचार न करता, कायद्याच्या चौकटीत आम्ही कारवाई केली आहे.”
पोलिसांनी जी माहिती दिली ती पूर्णपणे कायदेशीर स्वरूपाची असून, पुणे पोलिसांच्या भूमिकेवर कोणताही संशय घेण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
शनिवारी रात्री खराडीतील फ्लॅटवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता. यामध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली होती. या कारवाईत २.७ ग्रॅम कोकेन, ७० ग्रॅम गांजा आणि मद्यसाठा जप्त करण्यात आला होता. या घटनेने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवली होती.