विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पार पाडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला देशभरातून प्रशंसा मिळत असताना, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत या कारवाईविरोधात आक्रमक भाष्य करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर तसेच भारताच्या परराष्ट्र धोरणावर जोरदार टीका केली. यातून भारत आणि अमेरिका यांच्यातील साैहार्दाचे संबंध बिघडविण्याच लाेकसभेतील विराेधी पक्षनेते राहुल गांधी यांचा डाव असल्याची चर्चा सुरू आहे.
राहुल गांधींनी ‘ऑपरेशन सिंदूर’ला फक्त प्रचारात्मक उपक्रम म्हटले आणि पंतप्रधानांनी केवळ स्वतःची प्रतिमा वाचवण्यासाठी ही कारवाई केल्याचा आरोप केला. सरकारवर “राजकीय इच्छाशक्तीचा अभाव” असल्याचे म्हटले. मात्र राजकीय विश्लेषकांच्या मते, त्यांच्या भाषणामागे भारताच्या अमेरिका धोरणात संभ्रम निर्माण करून आणि मोदी सरकारला अस्थिर करण्याचे षडयंत्र हाेते.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना लोकसभेतून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना “खोटारडा” म्हणण्याचे आव्हान दिले. विश्लेषकांच्या मते, हे फक्त राजकीय आरोप नव्हते, तर एक प्रकारचा सापळा होता. त्यांनी मोदींना उकसवून भारत-अमेरिका संबंधांमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोदींनी संयम राखत कोणताही उग्र प्रतिसाद दिला नाही. उलटपक्षी, मोदींनी दाखवलेले संयम आणि दूरदृष्टी हेच त्यांच्या परराष्ट्र धोरणाचे मुख्य वैशिष्ट्य असल्याचे अनेकांनी नमूद केले आहे.
राहुल गांधींनी ऑपरेशन सिंदूरवर टीका केली असली, तरी प्रत्यक्षात ही कारवाई अतिशय अचूक आणि वेळीच करण्यात आली होती. पहलगाम हल्ल्याच्या अवघ्या ४८ तासांत भारतीय लष्कराने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले.
पंतप्रधान मोदींनी लोकसभेत स्पष्टपणे सांगितले की, कोणत्याही आंतरराष्ट्रीय दबावामुळे भारताने युद्धविराम घोषित केला नव्हता. उलट, पाकिस्तानच भारताकडे दया मागत होता. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनीही ऑपरेशन सुरू असताना मोदींना फोन केला, त्यावेळी मोदींनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले: “जर तुमचा हेतू युद्ध थांबवण्याचा असेल, तर त्याची किंमत मोजावी लागेल. गोळीला उत्तर गोळ्याने दिलं जाईल!”
मोदी सरकार केवळ अमेरिका वा पश्चिमेकडील राष्ट्रांच्या मागे धावत नाही. भारत आपली भूमिका ‘जागतिक दक्षिण’चे नेतृत्व म्हणून प्रस्थापित करत आहे. आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि ASEAN देशांशी मजबूत संबंध निर्माण करत BRICS समूहाच्या माध्यमातून पश्चिमी वर्चस्वाला पर्याय उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे. रशियाशी संबंध कायम ठेवून भारताने आपल्या रणनीतिक स्वातंत्र्याचे उदाहरणही जगासमोर ठेवले आहे. युक्रेन युद्धादरम्यान पश्चिम देशांनी भारताकडून रशियावर निर्बंध लावण्याची अपेक्षा केली, मात्र भारताने स्वतःचा तटस्थ आणि स्वतंत्र दृष्टिकोन कायम ठेवला.