विशेष प्रतिनिधी
पुणे : कारगिल युद्धात सेवा बजावलेल्या माजी सैनिकाच्या घरी मध्यरात्री टोळक्याने घरात घुसून गोंधळ घातला. पीडित कुटुंबाने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आरोपींविरोधात गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याची गंभीर दखल घेत दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. Muslim soldier
शमशाद अली शेख असे या प्रकरणातील तक्रारदाराचे नाव आहे. त्यांच्या कुटुंबात आजोबा आणि चुलते भारतीय लष्करात सेवा बजावलेले माजी सैनिक आहेत. गुरुवारी मध्यरात्री बारा वाजता काही अज्ञात इसमांनी त्यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. घरात घुसल्यानंतर टोळक्याने “तुम्ही रोहिंग्या आहात, बांगलादेशी आहात, इथून निघून जा” अशा प्रकारच्या धमक्या दिल्या. तसेच, घरात गोंधळ घालत घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या घटनेनंतर शेख कुटुंबीयांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. पीडित कुटुंबाशी संवाद साधला. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून, देशासाठी लढणाऱ्या सैनिकाच्या कुटुंबावर झालेला हा हल्ला संपूर्ण समाजासाठी चिंता निर्माण करणारा आहे. या घटनेमुळे शेख कुटुंब भयभीत झाले असून, परिसरातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे.
पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत असून, लवकरच त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
चंदननगरच्या पीडितांसोबत माझी विस्तृत चर्चा झाली आहे. याप्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. शनिवारी आणि रविरात्री रात्री काही लोकांनी पीडितांच्या घरी जाऊन गोंधळ घातला, आपत्तीजनक कृत्य केले. विशिष्ट समुदायाविषयी काही लोक घोषणा देत होते. याप्रकरणात एक गुन्हा पोलिसांकडून दाखल करण्यात आलेला आहे. आज पुन्हा सगळ्यांचे जबाब घेण्यात येत आहेत. दोषींवर कडक कारवाई करण्याचा पीडितांना आम्ही शब्द दिलाय, त्यांनी पोलिसांच्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे, असे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले.
ही घटना उघडीकीस आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाष्य केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, 1971 च्या युद्धासह कारगिल युद्धात भाग घेतलेल्या मुस्लिम जवानाच्या कुटुंबाची बांगलादेशी असल्याच्या संशयावरून काही कडव्या उजव्या विचाराच्या संघटना धाकदडपशाहीने चौकशी करत असतील, त्यांच्याकडील आधारकार्ड, पॅनकार्ड खोटे असल्याचे सांगत त्यांना घराबाहेर काढण्याची धमकी देत असतील आणि कथित सिव्हिल ड्रेसमधील पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेत असतील तर याचे कदापि समर्थन करता येणार नाही.