विशेष प्रतिनिधी
मालेगाव : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व सात आरोपींना एनआयएच्या विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. मालेगावमध्ये स्फोट झाल्याचे सरकारी वकिलांनी सिद्ध केले, परंतु त्या मोटारसायकलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता हे सिद्ध करू शकले नाहीत. जखमींचे वय १०१ नाही तर ९५ वर्षे होते आणि काही वैद्यकीय प्रमाणपत्रांमध्ये छेडछाड करण्यात आली होती, असा निष्कर्ष न्यायालय काढला आहे’,असं निकाल वाचताना एनआयए कोर्टाचे न्यायाधीश म्हणाले. Sadhvi Pragya Singh
न्यायाधीश ए.के. लाहोटी म्हणाले की, ज्या बाईकमध्ये स्फोट झाला, ती साध्वी प्रज्ञा यांच्या नावावर होती, हे सिद्ध होऊ शकत नाही. कर्नल प्रसाद पुरोहित यांनी बॉम्ब बनवला हे देखील सिद्ध होऊ शकत नाही. कट रचल्याचा कोणताही अँगल सिद्ध झाला नाही. मालेगाव बॉम्बस्फोट २९ सप्टेंबर २००८ रोजी झाले होते. भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी आणि सुधाकर धर द्विवेदी हे आरोपी आहेत.
या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता. त १०१ जण जखमी झाले होते. या स्फोटामागे हिंदू उजव्या विचारसरणीच्या गटांशी संबंधित लोकांचा हात असल्याचा आरोप होता. या प्रकरणाचा प्रारंभिक तपास महाराष्ट्र एटीएसने केला होता. २०११ मध्ये हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले. २०१६ मध्ये एनआयएने आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात ३ तपास संस्था आणि ४ न्यायाधीश बदलले आहेत. यापूर्वी निर्णय ८ मे २०२५ रोजी येणार होता, परंतु नंतर तो ३१ जुलैपर्यंत राखीव ठेवण्यात आला.
२९ सप्टेंबर २००८ रोजी लोक रमजान महिना आणि नवरात्रोत्सव साजरा करण्यात व्यस्त होते. रात्री ९.३५ वाजता मालेगावमधील भिखू चौकात बॉम्बस्फोट झाला. सर्वत्र धूर आणि लोकांचे किंकाळ्या ऐकू येत होत्या. ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. १०० हून अधिक लोक जखमी झाले. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या शहरात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात राहतात. या ठिकाणीच हा स्फोट झाला होता.
एनआयए न्यायालयात न्यायाधीशांना उद्देशून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या, “मी सुरुवातीपासून हेच सांगत होते की ज्यांना चौकशीसाठी बोलावले जाते, त्याच्यामागे काहीतरी आधार असावा. मला त्यांनी चौकशीसाठी बोलावले आणि अटक करून त्रास दिला. यामुळे माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले. मी संन्याशाचे जीवन जगत होते, पण मला आरोपी बनवले गेले आणि कोणीही आमच्या बाजूने उभे राहायला तयार नव्हते. मी संन्यासी असल्यामुळेच जिवंत आहे. त्यांनी कट रचून भगव्याला बदनाम केले. आज भगवा जिंकला आहे आणि हिंदुत्व जिंकले आहे, आणि जे दोषी आहेत त्यांना देव शिक्षा करेल. मात्र, ज्यांनी भारताला आणि भगव्याला बदनाम केले, ते तुमच्याकडून चुकीचे सिद्ध झालेले नाहीत…”