विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर: नांदणी येथील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थानी असलेल्या महादेवी हत्तीणीला ( Mahadevi elephant) गुजरातमधील वनतारा प्रकल्पात हलवण्यात आल्यानंतर, कोल्हापूर जिल्ह्यातील जैन समाजात तीव्र नाराजीचा सूर आहे. या कृतीचा निषेध करण्यासाठी समाजाने एक अनोखा आणि शांततामय मार्ग निवडला आहे, ‘जिओ’ मोबाईल सेवा बहिष्कार आणि नंबर पोर्टिंग मोहीम धडाक्याने सुरू झाली आहे. त्यातच आता राजकारणी मंडळींनी देखील आपले दंड थोपटले आहेत. माधुरीला परत आणणारच असा जनतेचा निर्धार आहे.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेत महादेवी हत्तीणीला ( Mahadevi elephant) वनतारामध्ये नेल्याच्या कृतीवर भाष्य केले आहे. माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, “कायदा वाकवून अन्याय केला जातो, याचे उदाहरण म्हणजे हत्तीणीला वनतारामध्ये नेणे. माझ्याकडे नांदणी मठाच्या माधुरी हत्तीणीची तब्येत चांगली असल्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पत्रं आहेत. माधुरी हत्तीण वनताराकडे नेण्यासाठीच पेटा काम करत होतं.पेटाची भूमिका प्रामाणिक असती, तर त्यांनी वनतारा सोडून अन्य ठिकाणी हत्तीण पाठवली असती. पेटा स्थापन होण्यापूर्वीपासून माधुरी हत्तीण या मठात आहे. अंबानीला हत्तीची गरज का आहे? हे कळेना झाले आहे.”
हे कोर्टाचा वापर करून, कोर्टाची दिशाभूल करून माधुरीला तिकडे घेऊन गेले आहेत. मात्र आता आम्ही गप्प बसणार नाही, माधुरीला परत आणणारच. सरकार अंबानीचं बटीक व्हायला लागले आहे. एक रविवार माधुरीसाठी मोहीम राबवली जाणार आहे. येत्या रविवारी नांदणी मठ ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.
काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी आज नांदणी येथील मठाला भेट दिली. पेटाने एचपीसीकडे अर्ज केला की, हा हत्ती गुजरातला हलवला पाहिजे, तिथून शंकेला सुरुवात होते. एखाद्या प्राण्याची व्यवस्था नीट होत नसेल, तर पेटा त्या संदर्भात आपले मत मांडत असते. हायकोर्टाने पहिल्या टप्प्यात स्थगिती दिली होती. दुसऱ्या टप्प्यात काही अडचणी आल्या. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने ताबडतोब हत्ती देण्याची भूमिका घेतली, आणि पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला. यामुळे जैन समाज, हिंदू धर्माच्या भावना दुखावण्याचा काम या सगळ्या प्रकरणात झाले आहे. गेली 30 वर्षाहून अधिक काळ मठाने ज्या हत्तीची जपणूक केली, तो घेऊन जाण्याचे पाप या मंडळींनी केलं आहे.सुप्रीम कोर्टाने निर्णय देऊन आमचे हात बांधले आहेत, त्यामुळे राष्ट्रपतींनी यात हस्तक्षेप करावा आणि आमचा हत्ती परत द्यावा, अशी आमची कोल्हापूरकर म्हणून अपेक्षा आहे.