विशेष प्रतिनिधी
पुणे: नितीन गडकरी हे केवळ ‘मॅन ऑफ व्हिजन’ नसून ‘मॅन ऑफ ॲक्शन’ आहेत. हजारो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे अफाट कार्य त्यांनी केले आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार -२०२५ त्यांना प्रदान करणे हा एका कृतीशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान समारंभात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, लोकमान्य टिळकांचा स्वाभिमानी बाणा आधुनिक भारतामध्ये ज्या व्यक्तींच्या कार्यामध्ये दिसतो अशा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जावा ही संकल्पनाच अतिशय विलक्षण आहे. लोकमान्यांचा हा बाणा नितीन गडकरी यांच्या अंगी ठायी-ठायी दिसतो. काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे त्यांचे नेतृत्व आहे. विलक्षण प्रतिभा त्यासोबत संवेदनशीलता आणि सातत्याने समाजकारणाची प्रेरणा देणारे संस्कार त्यांनी जोपासले आहेत. ते चांगले संशोधक आहेत. कृषी, अभियांत्रिकी, वैद्यक, उद्योग, स्थापत्य आणि विज्ञान क्षेत्रातील त्यांचे ज्ञान अफाट आहे. नवनवीन बाबींकडे ते आकृष्ट होतात. या बाबी सामान्य माणसापर्यंत कशा पोहोचता येतील, असा त्यांचा प्रयत्न असतो.
मुख्यमंत्री म्हणाले, केंद्रीय मंत्री गडकरी यांचा ‘नेव्हर डाय ॲटीट्यूड’ हे त्यांच्या स्वभवाचे वैशिष्ट्य आहे, ते कोणत्याही प्रसंगाला धैर्याने सामोरे जातात म्हणूनच ते मोठे कार्य उभे करू शकतात. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची यशस्वी उभारणी केल्यानेच अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची जबाबदारी गडकरी यांच्यावर विश्वासाने सोपावली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्यातील हीच गुणवत्ता ओळखून त्यांच्यावर रस्ते आणि महामार्ग विकासाचे काम सोपवले. एकेकाळी जगातील पायाभूत सुविधा पाहण्यासाठी आपण अन्यत्र जात होतो, आज जग आपल्याकडे येत आहे, हे गडकरी यांचे यश आहे. त्यांच्या कार्यामुळे देशात रस्ते उभारणीच्या कामात गुणात्मक परिवर्तन सुरू झाले. त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात सर्वाधिक कार्यक्षम मंत्री म्हणून ओळख प्रस्थापित केली आहे. देशाच्या सीमेवर रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याचे कार्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी प्रतिकूल परिस्थितीतही मोठी स्वप्ने पाहण्यास शिकवले. त्यासाठी निधी कसा उभा करायचा हे शिकवले. त्यांचा स्पष्टवक्तेपणा लोकांना आवडतो. कोणतीही गोष्ट गुणवत्तापूर्ण असावी, हा त्यांचा दंडक आहे. याबरोबरच ते देशभरातील कानाकोपऱ्यातील खाद्य संस्कृतीचे चाहते आहेत. आधुनिक भारताच्या जडणघडणीत गडकरी यांचे योगदान महत्त्वपूर्ण असून त्यांना दिल्या या पुरस्काराच्या रुपाने महाराष्ट्रातील एका दृष्ट्या, परिवर्तनशील, प्रेरक, कृतीशील आणि संवेदनशील व्यक्तीमत्त्वाचा सन्मान केला जात आहे, ही सर्वांसाठीच अभिमानाची बाब आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
Nitin Gadkari is a ‘man of action’, praises Chief Minister Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- पीएम मोदींचे संसदेतील संपूर्ण भाषण; काँग्रेसला दाखवला आरसा, म्हणाले- इतकी चर्चा करा की शत्रू घाबरेल!
- जगातल्या कुठल्याही नेत्याने Operation Sindoor थांबवायला सांगितले नाही; डोनाल्ड ट्रम्पच्या 25 दाव्यांना मोदींचा एकच फटका
- Bihar SIR : बिहारमध्ये SIR वर तूर्त बंदी नाही; SCने ECला विचारले- आधार कार्ड व मतदार ओळखपत्र का समाविष्ट करत नाही?
- Shashi Tharoor : ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, थरूर म्हणाले – मौन व्रत; संसदेत काँग्रेसच्या विचारसरणीवर बोलण्यास नकार दिल्याची चर्चा