विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी गुरुग्राम जमीन व्यवहारात बेकायदेशीर ₹५८ कोटी कमावले असून विविध कंपन्यांमार्फत निधी वळविल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे.
इन्फोर्समेंट डायरेक्टरेटने (ED) रॉबर्ट वाड्रा यांच्या विरोधात गुरुग्रामच्या शिकोहपूर गावातील जमीन व्यवहार प्रकरणात ₹५८ कोटींच्या मनी लॉन्डरिंगप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात वाड्रा यांनी बेकायदेशीररित्या मिळवलेल्या रकमेचे दोन कंपन्यांमार्फत हेराफेरी केल्याचा आरोप आहे. ब्लू ब्रीझ ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड (₹५ कोटी) आणि स्काय लाइट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड (₹५३ कोटी) या कंपन्यांनी निधी वळविला.
ईडीच्या तपासानुसार ही रक्कम विविध मालमत्ता खरेदी, गुंतवणूक, कर्जपुरवठा आणि त्यांच्या गटातील कंपन्यांचे देणे फिटणे यासाठी वापरण्यात आली. या प्रकरणाची सुरुवात २०१८ मध्ये हरियाणा पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरपासून झाली. त्यात तत्कालीन मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा, डीएलएफ लिमिटेड आणि इतरांवर फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, कटकारस्थान आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर डिसेंबर २०१८ मध्ये ईडीने मनी लॉन्डरिंगचा तपास सुरू केला.
आरोपपत्रानुसार स्काय लाइट हॉस्पिटॅलिटीने ऑनकारेश्वर प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडकडून ३.५ एकर जमीन विक्री दस्तऐवजनुसार ₹७.५ कोटींना घेतली. मात्र प्रत्यक्ष ठरलेली रक्कम वेगळी होती आणि विक्री करारातील धनादेश कधीच वटला नाही. या व्यवहारामुळे ₹४५ लाखांच्या स्टॅम्प ड्युटी चोरीचा आरोप करण्यात आला आहे. ईडीच्या मते, हा व्यवहार ‘क्विड प्रो क्वो’ अंतर्गत झाला असून, जमिनीचा ताबा प्रत्यक्ष देयाशिवाय वाड्रांच्या प्रभावाच्या मोबदल्यात देण्यात आला, ज्यामुळे ऑनकारेश्वर प्रॉपर्टीजला त्याच भागात व्यावसायिक परवाना मिळाला.
आरोपपत्रात वाड्रांचे सहकारी सत्यनंद याजी, केवल सिंग विरक आणि स्काय लाइट रिअल्टी, ऑनकारेश्वर प्रॉपर्टीज (सध्याचे एसजीवाय प्रॉपर्टीज) यांसारख्या कंपन्यांची नावे देखील आहेत. या व्यवहारातील चुकीच्या मांडणीमुळे निधी विविध मालमत्तांमध्ये वळवला गेला, असा ईडीचा आरोप आहे.
ईडीने आतापर्यंत ₹३८.६९ कोटींच्या ४३ स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. यात बिकानेरमधील जमीन, गुरुग्राम, मोहाली, नोएडा येथील व्यावसायिक युनिट्स आणि अहमदाबादमधील निवासी फ्लॅट्स यांचा समावेश आहे. काही मालमत्ता थेट वाड्रांच्या नावावर असून काही त्यांच्या कंपन्यांच्या जसे की स्काय लाइट रिअल्टी, रिअल अर्थ इस्टेट्स, आर्टेक्स नावावर आहेत.
ईडीने न्यायालयाकडे वाड्रांना जास्तीत जास्त सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्याची आणि जप्त केलेल्या मालमत्तांचा सरकारी ताबा घेण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात वाड्रा “Accused No. 1” म्हणून नमूद असून, एकूण ११ आरोपी आणि सात कंपन्या आरोपपत्रात आहेत.
Robert Vadra earned ₹58 crore illegally in Gurugram land deal
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला