विशेष प्रतिनिधी
पुणे:गणेशोत्सव हा पुण्याचा सांस्कृतिक वारसा आहे. तो शांततेत आणि सुरक्षितपणे साजरा व्हावा, यासाठी सर्व विभाग एकत्रितपणे काम करत आहेत. विसर्जन मिरवणुकीसह उत्सवाचे उर्वरित नऊ दिवस यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजनाला प्राधान्य आहे.पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची ग्वाही.
Ganesh Festival
पुण्यातील गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत पार पाडण्यासाठी शहर पोलिस दल, महापालिका, जिल्हा प्रशासन आणि महावितरण यांच्यासह सर्व विभाग समन्वयाने काम करत आहेत. मंगळवारी (ता. १९) बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित बैठकीत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यंदाच्या गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. या बैठकीला महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्रकुमार डुडी, पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, राजेश बनसोडे, पंकज देशमुख यांच्यासह गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले, “गणेशोत्सव हा पुण्याचा सांस्कृतिक वारसा आहे. तो शांततेत आणि सुरक्षितपणे साजरा व्हावा, यासाठी सर्व विभाग एकत्रितपणे काम करत आहेत. विसर्जन मिरवणुकीसह उत्सवाचे उर्वरित नऊ दिवस यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजनाला प्राधान्य आहे. काही मंडळांमध्ये विसर्जन मिरवणुकीबाबत मतभेद असल्याचे दिसत आहे, ही बाब खेदजनक आहे. मात्र, आमच्यासाठी सर्व गणेश मंडळे समान आहेत. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आणि लोकप्रतिनिधी तसेच प्रतिष्ठित नागरिकांचा सहभाग घेऊन येत्या २५ ऑगस्टपर्यंत या वादांवर तोडगा काढला जाईल.”
कुमार यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शॉर्टसर्किटसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी महावितरण आणि मंडळांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले. “मंडळांनी आक्षेपार्ह देखावे टाळावेत आणि सामाजिक सलोखा राखावा. विसर्जन मिरवणुकीत अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक आणि वाहतूक पोलिसांना मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याचे आणि व्हॉट्सअॅप ग्रूप तयार करून समन्वय वाढवण्याचे निर्देश कुमार यांनी दिले. “वाहन पार्किंग, स्वयंसेवकांचे नियोजन आणि गर्दी व्यवस्थापनासाठी सूक्ष्म नियोजन आवश्यक आहे. मंडळांनी पोलिसांना पूर्ण सहकार्य करावे,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दही हंडीच्या वेळी शहरात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची दखल घेत आयुक्तांनी विसर्जन मिरवणुकीत अशा घटना टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. “पेठांमध्ये अनावश्यक ‘नो एंट्री’ काढून भाविकांच्या गर्दीचे नियोजन करावे. यासाठी वाहतूक, वायरलेस आणि अन्य विभागांनी स्वतंत्र बैठक घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात,” असे त्यांनी सांगितले.
कुमार यांनी मंडळांना आत्मपरीक्षणाचा सल्ला देताना म्हटले, “गणेश मंडळांनी आपसातील कटुता कमी करावी. सर्व मंडळे गणेशभक्तच आहेत, कोणी छोटे-मोठे नाही. पोलिसांवर विश्वास ठेवा. सर्व शंकांचे निराकरण करून विसर्जन मिरवणुकीसाठी योग्य मार्ग काढला जाईल.” त्यांनी मंडळांना सकारात्मक सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
प्रशासनाचे सहकार्य आणि मंडळांचे मत
जिल्हाधिकारी जितेंद्रकुमार डुडी यांनी गणेशोत्सवासाठी वीज, रस्ते, स्वच्छता आणि पाणीपुरवठ्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. “पुण्याच्या गणेशोत्सवाची ख्याती जागतिक पातळीवर पोहोचली पाहिजे. मंडळांनी समाजाभिमुख देखाव्यांद्वारे सकारात्मक संदेश द्यावा,” असे ते म्हणाले.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले, “उत्सवासाठी रस्ते, ड्रेनेज आणि स्वच्छतागृहांच्या सुविधा वाढवण्यात येत आहेत. यंदा पोर्टेबल स्वच्छतागृहांची संख्या गतवर्षापेक्षा जास्त असेल.” त्यांनी मंडळांच्या अडचणी दूर करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांतील अधिकाऱ्यांना समन्वय ठेवण्याचे निर्देश दिले.
बैठकीत मंडळांनी प्रशासनाच्या समन्वयाच्या अभावावर नाराजी व्यक्त केली. विघ्नहर्ता न्यासचे विश्वस्त प्रा. डॉ. मिलिंद भोई यांनी समन्वय आणि दक्षता कक्षांचे संपर्क क्रमांक प्रसिद्ध करण्याची मागणी केली. गणेश भोकरे यांनी मंडळांना समान न्यायाची अपेक्षा व्यक्त केली, तर पुष्कर तुळजापूरकर यांनी अधिक बैठका घेण्याची सूचना केली.
Police Commissioner appeals to all stakeholders to cooperate to celebrate Ganesh Festival peacefully
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला