विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी आणि शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या मुंबईतील दादर शिवाजी पार्क परिसरात असलेल्या पुतळ्यावर अज्ञाताने रंग टाकल्याची घटना उघडकीस आल्याने तणाव निर्माण झाला आहे. सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिवाजी पार्क परिसरामध्ये शिवसैनिक आणि ठाकरे गटाचे नेते दाखल झाले. त्यानंतर पुतळ्याची स्वच्छता करून घेण्यात आली.
अज्ञात समाज कंटकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसैनिकांकडून केली जात आहे. दादर शिवाजी पार्क परिसराममध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे. रस्त्यालगत असलेल्या या पुतळ्यावर अज्ञाताकडून लाल रंग फेकून त्याच विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. ही बाब कानावर पडताच शिवसैनिक, तसेच स्थानिक खासदार अनिल देसाई आणि आमदार महेश सावंत हे घटनास्थळी दाखल झाले.
शिवसैनिकांनी पुतळ्याची स्वच्छता करून घेतली. मात्र आता शिवाजी पार्क परिसरात शिवसैनिक दाखल होण्यास सुरुवात झाली असून, परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
परिसरात असलेल्या सीसीटीव्हींमधील फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला जात आहे. प्राथमिक माहितीमध्ये हा प्रकार सकाळी ६ वाजून १० मिनिटांच्या नंतर घडल्याचे समोर आले आहे. तसेच संबंधित चित्रिकरण पोलिसांच्या हाती लागले असून, आरोपीला लवकरच ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती मिळत आहे.
ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.हे कृत्य करणाऱ्या भेकडांना आणि समाजकंटकांना योग्य उत्तर दिलं जाईल. या घटनेची कल्पना उद्धव ठाकरे यांना देण्यात आली असून, ही घटना म्हणजे राज्य सरकारला आलेलं अपयश आहे. आज मुंबई सुरक्षित नाही. सरकार काय करत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.