विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आरोप केल्यावर ठाकरे गट संतप्त झाला आहे. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर पलटवार करत थेट पत्नीच्या मृत्यू प्रकरणावर प्रश्न केले आहेत.
शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांनी आज (4 ऑक्टोबर) थेट रामदास कदम यांच्या आरोपांना आव्हान दिले आहे. एवढेच नाही तर रामदास कदम यांच्या विरोधात कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा करण्याचा इशारा दिला. 13 वर्षे मौन बाळगणारे कदम यांना 13 वर्षांनी अचानक कसा कंठ फुटला, असा सवाल करत कदम यांच्या नार्को टेस्टचे आव्हान स्वीकारल्याचे अनिल परब म्हणाले. एवढेच नाही तर या नार्को टेस्टमध्ये रामदास कदम यांच्या पत्नीला 1993 मध्ये काय झाले, त्यांनी जाळून घेतले की जाळण्यात आले, याचीही नार्को टेस्टमध्ये माहिती द्यावी, असे आव्हान कदम यांना दिले.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात 2 ऑक्टोबर रोजी रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवाबाबत मोठा दाव करत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला होता. बाळासाहेबांचे पार्थिव दोन दिवस मातोश्रीवर होते. त्यांच्या पार्थिवाचा छळ करण्यात आला. शिवाय शरद पवार यांनाही बाळासाहेबांच्या पार्थिवाकडे जाऊ देण्यात आले नाही आणि उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतल्याचे आरोप रामदास कदम यांनी सलग दोन दिवस केले होते. एवढेच नाही तर माझी आणि उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करावी, असे आव्हानही रामदास कदम यांनी दिले होते.
रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती रामदास कदम यांच्याबाबत 1993 मध्ये एक घटना घडली. नार्को टेस्ट करताना रामदास कदम यांच्या पत्नीला कुणी जाळले की त्यांनी जाळून घेतले याचीही चौकशी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी करावी, असे आव्हान अनिल परब यांनी दिले. त्याचवेळी रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या पार्थिवाबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा अनिल परब यांनी दिला. रामदास कदम हे अर्धज्ञानी आहेत. या शिशुपालाचे अपराध भरले आहेत, असे सांगतानाच उद्धव ठाकरे इतके वाईट होते मग 2014 मध्ये उद्धव ठाकरेंकडून मंत्रिपद का मागून घेतले, असा सवालही अनिल परब यांनी केला.
सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे यांचे पार्थिव अँब्युलन्सने शिवाजी पार्कला नेण्याचा प्रस्ताव होता. मात्र, सर्वानुमते इथूनच अंत्ययात्रा काढण्याचे ठरले. त्यावेळी तिथे शिवसेनेचे सर्व नेते होते. मात्र, कदम आता त्यांच्या सोयीने बोलत आहेत, असा आरोप अनिल परब यांनी केला. तसेच कुठलाही मृतदेह 2 दिवस शवपेटीशिवाय ठेवता येतो का, पार्थिवाच्या अंगठ्यांच्या ठशांना काही अर्थ असतो का, स्विस बँकेची पद्धत रामदास कदमांना ठावूक आहे का? असे सवाल अनिल परब यांनी उपस्थित केले. तसेच पवारसाहेबांना पार्थिव पाहायला जाऊ दिले नाही असे रामदास कदम म्हणत असतील तर याचे उत्तर पवारसाहेब तसेच मिलिंद नार्वेकर देतील, असेही परब यांनी स्पष्ट केले.
पुढच्या अधिवेशनात कदम यांच्याविरोधातील सर्व पुरावे सादर करणार आणि अशा मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी हाकलून द्यावे, अशी मागणी करणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले. त्यांनी बाळासाहेबांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला. मुळात मृत्यू जाहीर करण्याचा अधिकार डॉक्टरांचा असतो. डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच डॉक्टरांच्या उपस्थितीत शिवसेना नेत्यांनी बाळासाहेबांच्या निधन झाल्याचे जाहीर केले. यावरून कदम यांनी खोटे आरोप केल्यामुळे त्यांना कोर्टात खेचत आहे. त्यांनी माफी मागितली नाही तर अब्रुनुकसानीचा दावा करणार. मात्र, हा दावा आर्थिक नसेल कारण आमच्या लेखी कदम यांचे मूल्य शून्य आहे. त्यामुळे कोर्ट करेल तीच शिक्षा त्यांच्यासाठी असेल, असे अनिल परब यांनी सांगितले.
Anil Parab hits back at Ramdas Kadam, directly questions him on his wife’s death case
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!




















