विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्याच्या मॉडेल कॉलनीतील जैन बोर्डिंग विक्रीवरून सुरू झालेल्या वादात खासदार आणि केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हा विषय आपल्याला हवा त्या पद्धतीने संपविण्यासाठी भूमिका घेईल असे आश्वासन दिले. यावेळी मोहोळ यांना जैन समाजाच्या संतापाचा सामना करावा लागला.
पुण्यातील जैन बोर्डिंग घोटाळ्यावरून सातत्याने आरोप होत असताना, खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारी जैन बोर्डिंग उपोषणस्थळी जाऊन जैन मुनींची भेट घेतली. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मुरलीधर मोहोळ यांनी आपल्यावरील सर्व आरोपांचे खंडन केले. “मी या प्रकरणात सहभागी आहे किंवा माझे कोणीतरी सहभागी आहे, असे आरोप केले गेले. परंतु माझा यामध्ये कोणताही सहभाग नाही, हे मी वारंवार पुराव्यानिशी स्पष्ट केले आहे,” असे ते म्हणाले.
ते म्हणाले, “मी येथे केवळ वंदनीय जैन गुरुदेवांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. जर मी दोषी असतो, तर इथे येताना 100 वेळा विचार केला असता आणि आलोच नसतो. या संपूर्ण विषयावर केवळ राजकारण झाले आणि वैयक्तिक हेतूने या गोष्टी वाढवल्या गेल्या.
दरम्यान, जैन मुनींनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “जोपर्यंत तुम्ही हा विषय संपवत नाही, तोपर्यंत आम्ही समाधानी नाही.” तसेच, प्रसार माध्यमांनी हा विषय लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. यावर प्रतिक्रिया देताना मुरलीधर मोहोळ यांनी जैन मुनींनी दिलेल्या सूचना आपण लोकप्रतिनिधी म्हणून पूर्ण करू, त्यासाठीच आपण इथे आलो आहोत, असे आश्वासन दिले.
मोहोळ म्हणाले, पुढच्या काळात काही निर्णय होणे अपेक्षित असेल, तर या शहराचा खासदार, लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका महत्त्वाची यामध्ये काय असावी, याबाबत जेव्हा विषय झाला. मी माझ्या जैन बांधवांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, राजकीयदृष्ट्या आरोप-प्रत्यारोप खूप झाले. काही लोकांना या विषयाचा आधार घेऊन व्यक्तीगत पातळीवर जाऊन टीका केली. पण माझ्या जैन बांधवांनी एकही दिवस, एकदाही कधी माझे नाव या विषयात घेतले नाही.
राजू शेट्टी हे जैन समाजाचे येतात, त्यामुळे त्यांनी शंका उपस्थित केली होती की कदाचित मी पार्टनरशिप असलेल्या विकासकाने हा जैन बोर्डिंगचा व्यवहार केलाय. पण ज्यावेळी मी स्पष्टपणे माझे कागदोपत्री आणि सगळे पुरावे सादर केल्यानंतर, पुढे कुठेही असा विषय जैन समाजातून आला नाही. परंतू याचा वेगळा गैरफायदा स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी, राजकीय अस्तित्व जीवंत ठेवण्यासाठी काही मंडळींनी सातत्याने चालवले.
मागील दोन दिवसांपूर्वी जैन धर्मियांचे गुरुदेव या ठिकाणी या विषयासाठी बसलेले आहेत. त्यांचे शांततेत आंदोलन चालू आहे. त्यांनी मला आवाहन केले की, तुम्ही पुण्याचे लोकप्रतिनिधी आहात, आमच्या जैन समाजाला तुमची मदत हवीये. तुम्ही येथे या आणि आमच्यासाठी उभे राहा. या प्रकरणात जे काही राहिले, त्याबाबत पडदा दूर होईल, असे आवाहन त्यांनी केले.
माझा या प्रकरणात काही सहभाग असता, तर मी इथे येताना शंभरवेळा विचार केला असता. आलो नसतो. समाजाची आणि माझी या विषयातील भूमिका स्पष्ट आहे. इथे आल्यानंतर माझी भूमिका मांडली. लवकरात लवकर हा विषय संपला पाहिजे, असे गुरूदेवांनी सांगितले. हा व्यवहार रद्द होण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे, असेही त्यांनी मला सांगितले. त्यामुळे समाजाच्या भावना लक्षात घेऊन हा विषय कसा सोडवता येईल? यासाठी प्रामाणिकपणे तुमच्या सोबत उभा आहे. लवकरात लवकर यातून मार्ग काढू, असे मी त्यांना आश्वस्त केल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
मुरलीधर मोहोळ जैनमुनींची भेट घेऊन बाहेर निघाल्यानंतर जैन बांधवांनी त्यांना घेराव घातला. यावेळी जैन बांधव मुरलीधर मोहोळांविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. बोर्डिंग संदर्भात झालेला व्यवहार रद्द करावा, अशी मागणी जैन बांधवांनी यावेळी केली, तसेच जैन बोर्डिंग वाचवा, अशी घोषणाबाजी केली.
Murlidhar Mohol Amid Jain Boarding Sale Controversy
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात शिंदे – ठाकरे गटाचे नेते साथ साथ, रवींद्र धंगेकर यांना वसंत मोरेंचा पाठिंबा
- व्हिजन डॉक्युमेंट साकारणार विकसित भारताचे स्वप्न : मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- तर सर्वांची धार्मिक स्थळे अशीच लाटली जातील, जैन बोर्डिंग प्रकरणावरून रवींद्र धंगेकर यांचा इशारा
- औरंगजेबाच्या कबरीजवळ दिवा लावून दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस घ्या..



















