विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील गाजलेल्या जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात मोठा फेरबदल झाला आहे. गोखले लँडमार्क्स एलएलपीचे भागीदार विशाल गोखले यांनी स्मारक ट्रस्टकडून २३० कोटी रुपयांचा व्यवहार रद्द करण्याची आणि रक्कम परत देण्याची मागणी करत या व्यवहारातून औपचारिक माघार घेतली आहे.
२६ ऑक्टोबर २०२५ रोजी ट्रस्टला लिहिलेल्या पत्रात गोखले यांनी “नैतिक आणि सामाजिक कारणांमुळे” हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. त्यांनी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या विक्री करार आणि पावर ऑफ अॅटर्नीचे रद्दबातल पत्र (कॅन्सलेशन डीड) तयार करण्याची विनंती केली आहे.
भांबुर्डा, शिवाजीनगर येथील ट्रस्टच्या मालकीची ही जागा विक्रीसाठी दिल्याने मागील काही आठवड्यांपासून मोठे वादळ उठले होते. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा या व्यवहाराशी संबंध असल्याचा आरोप केला होता. तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पतसंस्थांनी केलेल्या गहाणखत रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर व्यवहारातील अनियमितता उघड केली होती.
गोखले यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले की, या प्रकरणातील कायदेशीर आणि सामाजिक गुंतागुंत लक्षात घेऊन त्यांनी ट्रस्टच्या प्रतिष्ठेचा सन्मान राखत हा निर्णय घेतला आहे. त्यांनी ट्रस्टचे योगदान “दीर्घकाळ समाजकार्यासाठी केलेले मोलाचे कार्य” असल्याचे नमूद केले आहे.
या निर्णयानंतर आता संपूर्ण व्यवहाराचा भवितव्य धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयावर अवलंबून आहे, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.
Vishal Gokhale Withdraws from Jain Boarding Land Deal
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















