विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत एका बाजुला एनडीए व महागठबंधन यांच्यात चुरशीचा सामना रंगला असताना राष्ट्रीय जनता दल भाऊबंदकीमुळे संकटात सापडला आहे. लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील अंतर्गत संघर्ष आता रस्त्यावर उतरला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख तेजस्वी यादव यांचे मोठे बंधू तेज प्रताप यादव यांना राष्ट्रीय जनता दलाच्या संतप्त समर्थकांनी हुसकावून लावल्याची आणि त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
तेज प्रताप यादव हे सध्या ‘जनशक्ती जनता दल’ (JJD) या त्यांच्या नव्या पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार करत आहेत. महनार विधानसभा मतदारसंघात JJD चे उमेदवार जय सिंह राठौर यांच्यासाठी प्रचारसभा संपवून परतत असताना हा प्रकार घडला.मिळालेल्या माहितीनुसार, तेज प्रताप यादव सभेहून परतत असताना, तिथे उपस्थित असलेल्या जमावाने त्यांच्यासमोर ‘लालटेन छाप जिंदाबाद’ आणि ‘तेजस्वी यादव जिंदाबाद’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. या घोषणाबाजीनंतर जमाव अधिक आक्रमक झाला आणि त्यांनी तेज प्रताप यांच्या गाडीचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला, तसेच त्यांच्या ताफ्यावर दगडफेकही केली. यामुळे तेज प्रताप यादव यांना घटनास्थळावरून तातडीने माघार घ्यावी लागली.
या घटनेनंतर JJD उमेदवार जय सिंह राठौर यांनी थेट RJD चे स्थानिक उमेदवार रवींद्र सिंह यांच्यावर कट रचून हा हल्ला घडवून आणल्याचा गंभीर आरोप केला आहे. “RJD च्या गुंडांनी हे कृत्य केले आहे. रवींद्र सिंह यांनी कोट्यवधी रुपयांमध्ये तिकीट विकत घेतले असून, निवडणुकीत तेच अशा धमक्या आणि हल्ले घडवून आणत आहेत,” असा आरोप राठौर यांनी केला आहे. बिहार निवडणुकीत दोन्ही भावांमध्ये वाढलेला राजकीय तणाव या घटनेतून पुन्हा एकदा उघड झाला आहे.
Family feud in Lalu’s clan: Tejashwi’s supporters chase away Tej Pratap
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















